दुबई : आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीला बुधवारपासून येथे सुरुवात होत असून, पी. व्ही. सिंधूसह भारताच्या अन्य प्रमुख खेळाडूंकडून स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.स्पर्धेला मंगळवारपासूनच पात्रता फेरीने सुरुवात झाली. मुख्य फेरीतील लढती बुधवारपासून सुरू होतील. भारतीय प्रमुख खेळाडू फारशा चांगल्या लयीत नाहीत. त्यामुळे या वेळी भारतीय खेळाडूंना पदकासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने १७ पदके मिळवली असून, एकमेव सुवर्णपदक दिनेश खन्नाने १९६५ मध्ये मिळवले होते.
सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारताची मदार प्रामुख्याने सिंधू, प्रणॉय आणि लक्ष्य सेन या खेळाडूंवर आहे. दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर परतल्यावर सिंधूने अलीकडेच माद्रिद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ही एकमेव कामगिरी वगळता सिंधूला पुनरागमनात फारशी चमक दाखवता आलेली नाही. सिंधूची पहिली लढत तैवानच्या वेन ची सु हिच्याशी होणार आहे.
पुरुष एकेरीत प्रणॉयच्या कामगिरीत बऱ्यापैकी सातत्य आहे. पहिल्या फेरीत प्रणॉयची गाठ म्यानमारच्या फोन प्याए नेंग, तर श्रीकांतची गाठ बहारिनच्या अदनान इब्राहिमशी पडणार आहे. लक्ष्य सेनसमोर पहिल्याच फेरीत सिंगापूरच्या माजी जगज्जेत्या लोह किनचे आव्हान असेल.महिला विभागात मालविका बनसोडची पहिल्याच फेरीत गतउपविजेती जपानच्या अकाने यामागुचीशी गाठ पडणार आहे.