पीटीआय, दुबई
भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अनुभवी खेळाडू किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पुरुष दुहेरीतील भारताची तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीनेही पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
सिंधूने चीनच्या हान युएइला २१-१२, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या सिंधूने हानविरुद्ध वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला गेम २१-१२ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने हीच लय कायम राखली. हानने काही चांगले फटके मारून गुण मिळवले. मात्र, सिंधूने खेळ उंचावल्यावर हानचा निभाव लागला नाही. सिंधूसमोर पुढील फेरीत कोरियाच्या दुसऱ्या मानांकित आन से यंगचे आव्हान असेल. आठव्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वी वाडरेयोला एक तासाहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात २१-१६, ५-२१, २१-१८ असे पराभूत केले. पुढच्या फेरीत त्याची गाठ जपानच्या केंटा सुनेयामाशी पडेल. श्रीकांतने चौथ्या मानांकित जपानच्या कोडाई नारोकाविरुद्ध १४-२१, २२-२०, ९-२१ अशी हार पत्करली.
पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीने कोरियाच्या जिन यंग व ना सुंग सेउंग जोडीला २१-१३, २१-११ असे नमवत पुढची फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित मोहम्मद एहसान व हेंद्र सेतिआवान जोडीशी होईल. रोहन कपूर व सिकी रेड्डी जोडीला मिश्र दुहेरीत पुढे चाल मिळाली. आता पुढच्या फेरीत त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या देजान फर्डिनानसिया व ग्लोरिया इमानुएल विदजाजा जोडीचे आव्हान असेल. बी सुमित रेड्डी व अश्विनी पोनप्पा जोडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.