ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोमने शानदार सुरुवात करत दक्षिण कोरियाच्या किम येजीचा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मेरी कोमसह एल. सरिता देवी (६० किलो) व पूजा राणी (७५ किलो) यांनीही आगेकूच केली.
पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमने २०१०च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. तिने किम हिला जोरदार ठोशांनी निष्प्रभ केले. तिने जबरदस्त शारीरिक क्षमता दाखवत तिने किम हिला फारशी संधी दिली नाही.
दोन मिनिटांच्या पहिल्या दोन फेरीत मेरीने निर्विवाद वर्चस्व गाजविले. किम हिला स्थानिक प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळाला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मेरीने आपला अव्वल दर्जा सिद्ध केला. तिसऱ्या फेरीनंतर पंचांनी लढत थांबवित मेरीला विजयी घोषित केले. तिला आता चीनच्या सेई हैजुआन हिच्याशी खेळावे लागणार आहे.
सरिता हिने दक्षिण कोरियाच्या चुंगसोन रेई हिचा दणदणीत पराभव केला. सरिताने ही लढत ३-० अशा फरकाने जिंकली. तिला आता मंगोलियाच्या ओयेंगरेल एर्देन हिच्याशी झुंजावे लागणार आहे. २०१२ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या पूजाने मंगोलियाच्या एर्देनसोयोल उंद्राम हिचा पराभव केला. तिने वेगवान खेळ करीत ही लढत ३-० अशी जिंकली. तिच्यापुढे शेन दारा फ्लोरा हिचे आव्हान असेल.
विनेश, गीतिकाला कांस्यपदक
कुस्ती
भारताच्या विनेश फोगट व गीतिका जाखर यांनी महिलांच्या कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवितशानदार प्रारंभ केला. विनेशने ४८ किला तर गीतिकाने ६३ किलो गटात हे यश संपादन केले.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या विनेशने कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या नारांगरेल एर्देनेसुख हिला केवळ दोन मिनिटे ३१ सेकंदात पराभूत केले. तिने अडीच मिनिटांत १०-० अशी आघाडी घेतल्यानंतर पंचांनी लढत थांबविली. त्याआधी तिने उत्तर कोरियाच्या योंगमी पाक हिला ३-१ असे हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पाठोपाठ तिने उजबेकिस्तानच्या दौलेतिबिके मुरातोवा हिला चीतपट करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत मात्र विनेश हिला जपानच्या एरी तोसाका हिने हरविले.
गीतिकाने कांस्यपदकाच्या लढतीत व्हिएतनामच्या लिथेई हिएन हिला केवळ ५५ सेकंदांत गारद केले. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गीतिकाने पहिल्या लढतीत थायलंडच्या जेरातवेई औनुन हिच्यावर निर्णायक विजय मिळविला. उपांत्य लढतीत गीतिका हिला चीनच्या झुओमा झिलोऊ हिच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले.
पुरुषांच्या फ्रीस्टाईल विभागात भारताच्या अमितकुमार व प्रवीण राणा यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या अमितकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र ५७ किलो गटाच्या या लढतीत त्याला जपानच्या फुमिताका मोरिशिता याने ३-१ असे हरविले. ७० किलो गटात प्रवीण याला जपानच्या ताकाफुमी कोजिमा याने ३-१ याच फरकाने पराभूत केले.
सांघिक पदक हुकले
नेमबाजी
चैन सिंगने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत नेमबाजांची पदक परंपरा कायम राखली, मात्र पुरुष संघाला तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने पदकाने हुलकावणी दिली.
चैन सिंगने ४४१.७ गुणांसह कांस्यपदक पटकावले. चीनच्या काओ येइफने सुवर्ण, तर झु निनाने रौप्यपदकावर नाव कोरले. पात्रता फेरीत सातवे स्थान मिळवत चैनने अंतिम फेरीत आगेकूच केली. या प्रकारात सहभागी होणाऱ्या गगन नारंग व संजीव राजपूत यांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. गगनने १२वा, तर संजीवने १५वा क्रमांक पटकावला. याच गटात सांघिक प्रकारात चैन सिंग, गगन नारंग आणि संजीव राजपूत या त्रिकुटाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नीलिंगमध्ये ११५३, प्रोन प्रकारात ११८५, तर स्टँडिंग प्रकारात ११४२ असे एकूण ३४८० गुण भारतीय संघाने मिळवले.
भारताची कोरियाशी गाठ
हॉकी
दुबळ्या चीनचा पराभव करण्यासाठी भारताला संघर्ष करावा लागला असला तरी भारतीय पुरुष हॉकी संघाने या विजयासह उपांत्य फेरी गाठली आहे, मात्र भारतासमोर उपांत्य फेरीत बलाढय़ दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.
पहिल्या दोन सत्रांत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र त्यानंतर ड्रॅगफ्लिकर व्ही. आर. रघुनाथने ४०व्या मिनिटाला आणि बिरेंद्र लाकराने ४५व्या मिनिटाला गोल करून भारताला २-० असा विजय मिळवून दिला. नवव्या क्रमांकावरील भारताची आघाडीची फळी २७व्या क्रमांकावरील चीनचा बचाव भेदण्यात अपयशी ठरली, मात्र भारताने सर्वाधिक वेळ चेंडूवर ताबा मिळवत सामन्यावर वर्चस्व गाजवले.
टेटेमध्ये विजय
टेबल टेनिस
भारतीय पुरुष आणि महिला टेबल टेनिसपटू संघांनी आपापल्या लढती
३-० अशा जिंकत आगेकूच केली. पुरुष संघाने कुवेतच्या संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. सौम्यजित घोषने अल्बाऱ्हानी हुसैनवर ११-१, ११-५, ५-११, ११-६ अशी मात केली. अचंता शरथ कमालने अल्बाहन जाबेरवर ११-५, १२-१०, ११-५ असा विजय मिळवला. अमलराज अँथनीने अल्नासारी बेसेलला ११-५, ११-८, ११-२ असे नमवले.
पाच पदके निश्चित
टेनिस
भारतीय टेनिसपटूंनी पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी अशी तीन प्रकारात उपांत्य फेरी गाठत तब्बल पाच पदकांची निश्चिती केली आहे. युकी भांब्रीने थायलंडच्या दनाई उडोमचोकचा ६-३, ६-२ असा पराभव केला. तैपेईच्या येन ह्य़ुस्युन ल्यूने सनम सिंगला ७-६, ६-४ असे नमवले. सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे जोडीने थायलंडच्या पिआनगटर्न प्लिपेयुच-निचा लेर्टपिटाकसिनाचाइ जोडीवर ६-१, ७-६ (४) अशी मात केली.
भारताची आगेकूच कयाकिंग आणि कनॉइंग
भारताच्या खेळाडूंनी कयाकिंग व कनोईंगमध्ये आगेकूच कायम राखली. अलबर्ट राज सेल्वराज याने एकेरीत उपांत्य फेरी गाठली. त्याने कयाकिंगमध्ये एक किलोमीटर अंतराची प्राथमिक फेरी १५ मिनिटे ३०६ सेकंदात पार केली. दुहेरीत सनीकुमार व चिंगचिंग सिंग अरामबाम यांनी एक किलोमीटर अंतराची शर्यत ३ मिनिटे ६०६ सेकंदात पार केली व उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी २०० मीटर शर्यतीमध्येही उपांत्य फेरी गाठली. भारताच्या गौरव तोमर याने कनोइंगमधील एक किलोमीटर अंतराची शर्यत १७ मिनिटे १६० सेकंदात पार करीत उपांत्य फेरी गाठली. दुहेरीत अजितकुमार साह व राजू रावत यांनी एक किलोमीटर अंतराची शर्यत ११ मिनिटे ६०६ सेकंदात पूर्ण केली आणि उपांत्य फेरीत स्थान मिळविले. कयाक फोर्स विभागात भारतीय संघाने उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. रमेश याने कयाकिंगच्या २०० मीटर शर्यतीतही उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या ५०० मीटर शर्यतीत भारताच्या बिजू अनुषा हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला.