आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारचा दिवस भारतीय महिला बॉक्सर्सच्या दृष्टीने निराशाजनक ठरला. मात्र, मेरी कोमने अंतिम फेरीत धडक मारल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा अजूनही कायम आहेत. ५७ ते ६० किलो वजनी गटात भारताच्या सरितादेवीला पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या या सामन्यात सरिताला कोरियाच्या पार्क जीनाकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र, यासाठी पंचांनी दिलेले सदोष निकाल कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या लढतीनंतर ट्विटरवर सामन्यातील पंचांविरूद्ध टीकेचा पाऊस पडताना दिसला.

तर दुसरीकडे ६९ ते ७५ या मध्यम वजनी गटातही भारताच्या पुजा राणीला चीनच्या क्युआन लीकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, ४८ ते ५१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या मेरी कोमने व्हिएतनामच्या थी बँगचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता मेरी कोम सुवर्णपदक मिळवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   

Story img Loader