आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सदोष वेळापत्रकामुळे भारताची पदकाची शक्यता कमी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपिका आणि जोश्ना चिनप्पा एकाच गटात असल्याने या दोघी उपांत्यपूर्व फेरीतच आमनेसामने येतील.
स्पर्धेच्या नियमानुसार एकाच देशाचे दोन खेळाडू एका गटात असू शकत नाहीत. जोश्ना-दीपिका जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीत जेतेपदाची कमाई केली होती. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरी प्रकारच नसल्याने पदकाच्या आशा एकेरीवरच आहेत. सदोष वेळापत्रकामुळे ही शक्यताही घसरणीला लागली आहे. ‘‘हे अत्यंत निराशाजनक आहे. यासंदर्भात मी भारतीय स्क्वॉश महासंघाकडे विचारणा केली आहे. मात्र अद्याप मला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हेच वेळापत्रक अंतिम झाल्यास स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयाचा विचार करते आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.
आशियाई सुवर्णपदक जिंकू -वॉल्श
भारतीय हॉकीने एकेकाळी सुवर्णपदकांचा धमाका लावलेला असला, तरी गेल्या १६ वर्षांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करता आलेली नाही. संघातील खेळाडूंना स्वत:वर दुर्दम्य विश्वास असून सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवून भारतीय संघ अव्वल कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी व्यक्त केला.

Story img Loader