आशियाई स्पर्धेत भारताने शुक्रवारी रुपेरी कामगिरीची नोंद केली. विजय कुमार, पेम्बा तमांग आणि गुरप्रीत सिंग या पुरुष नेमबाजांनी २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात पटकावलेले रौप्य आणि संदीप शेजवळचे कांस्य ही भारताची सातव्या दिवसाची कमाई ठरली. सलग सहा दिवस भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्यानंतर स्क्वॉशमध्ये पुरुष आणि महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारून किमान रौप्यपदक निश्चित केले व भारताला सुवर्णपदकाच्या आशा दाखवल्या आहेत. पारुपल्ली कश्यप, सायना नेहवाल या अव्वल बॅडमिंटनपटूंनी निराशा केल्यामुळे भारताचे एकेरीतील आव्हान पदकाविनाच संपुष्टात आले. भारतीय महिलांनी हॉकीत मलेशियावर ६-१ असा विजय मिळवत पदकाच्या आशा कायम राखल्या. एक सुवर्ण, दोन रौप्य आणि १४ कांस्यपदकांसह भारताची गुणतालिकेत १६व्या स्थानी घसरण झाली आहे.
नेमबाजी
भारतीय पुरुष नेमबाजांनी शानदार कामगिरी करत शुक्रवारी २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावत नेमबाजी या प्रकारात ‘शेवट रुपेरी’ केला. मात्र महिलांना ५० मीटर थ्री-पोझिशन प्रकारात पदकाविनाच मायदेशी परतावे लागले.
लंडन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमार, पेम्बा तमांग आणि गुरप्रीत सिंग यांच्या भारतीय संघाने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. मणक्याचा त्रास होत असतानाही विजय कुमारने सुरेख खेळ केला. मायदेशी परतल्यावर त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नेमबाजीतील भारताचे हे आठवे पदक ठरले. भारताने नेमबाजीत एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्यपदकांची कमाई केली. जितू राय आणि अभिनव बिंद्राचे वैयक्तिक पदक वगळता भारताने अन्य पदके सांघिक प्रकारात मिळवल्यामुळे भारतीय नेमबाजांसमोरील आव्हान किती खडतर झाले आहे, हे दिसून येते.
तमांगने ५८१ गुण मिळवत आठवे स्थान प्राप्त केले. त्यापाठोपाठ गुरप्रीतने ५८० गुणांसह नवव्या क्रमांकावर मजल मारली. विजय कुमार ५७९ गुणांसह १२व्या स्थानी राहिला. लज्जा गोस्वामी, अंजली भागवत आणि तेजस्विनी मुळ्ये यांच्या भारतीय महिला संघाला ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
लज्जा गोस्वामी हिने सातव्या क्रमांकावर झेप घेतली. पण अंजली (५७२ गुण) आणि तेजस्विनी (५६८ गुण) यांना अनुक्रमे २५व्या व २९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गोस्वामीने ५८२ गुण मिळवत अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. पण अंतिम फेरीत तिला सातत्य राखता आले नाही.
जलतरण: शेजवळला कांस्यपदक
अन्य जलतरणपटूंनी निराशा केल्यानंतर संदीप शेजवळने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्यपदक मिळवत दिलासा दिला. २५ वर्षीय शेजवळने २८.२५ सेंकद अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. कझाकस्तानच्या दिमित्री बलानदीन याने स्पर्धाविक्रम नोंदवताना सुवर्णपदक मिळवले. त्याने २७.७८ अशी कामगिरी केली. जपानच्या याशुहिरो कोसेकी याने २७.८९ सेकंद अशी वेळ देत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीपर्यंतही पोहोचू न शकणाऱ्या भारतीय जलतरणपटूंना शेजवळच्या या पदकामुळे दिलासा मिळाला आहे. २०१०च्या गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत वीरधवल खाडेने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळवत भारताचा आशियाई स्पर्धेतील २४ वर्षांपासूनचा दुष्काळ संपवला होता. त्याआधी खजान सिंगने १९८६मध्ये २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्यपदक मिळवले होते.
तिरंदाजी: महिला संघाला कांस्यपदकाची आशा
रिकव्‍‌र्ह एकेरी प्रकारात भारतीय तिरंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली, मात्र महिला संघाने कांस्यपदकाच्या आशा जिवंत राखल्या. दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी माझी आणि लैश्राम बॉम्बयला देवी या त्रिकुटाचा यजमान दक्षिण कोरियाने ६-० असा धुव्वा उडवला. कांस्यपदकासाठीच्या लढतीत त्यांचा मुकाबला जपानशी होणार आहे. याच त्रिकुटाने उझबेकिस्तानवर ६-० असा दणदणीत विजय मिळवला होता तर तैपेईवर ५-४ अशी निसटती मात केली होती. मात्र दक्षिण कोरियापुढे ते निष्प्रभ ठरले.
हाँगकाँगने अतन्यू दास, तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष रिकव्‍‌र्ह संघाला ५-३ असे नमवले.
स्क्वॉश: किमान दोन रौप्यपदके निश्चित
भारतीय स्क्वॉशपटूंनी आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजयी घोडदौड शुक्रवारीसुद्धा कायम राखताना किमान दोन रौप्यपदकांची निश्चिती केली आहे.
योरूमल कोर्टवर झालेल्या उपांत्य लढतीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आरामात जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.
जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल आणि अनाका अलंकामोनी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव केला. तसेच महेश माणगावकर, सौरव घोषाल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांच्या पुरुष संघाने कुवेतला २-० अशी धूळ चारली.
जोश्नाने पहिल्या लढतीत युनोक पार्कला ३४ मिनिटांत ११-६, १३-११, ११-८ असे हरवले. मग दीपिकाने एक गेम गमावूनसुद्धा सुनमी साँगचा ११-४, ११-५, ८-११, ११-५ असा पराभव केला. पुरुषांमध्ये मुंबईच्या माणगावकरने अल्तामिमी अम्मारला ३७ मिनिटांमध्ये ११-४, ११-३, १२-१० असे पराभूत केले. त्यानंतर घोषालने अल्मेझायीन अब्दुल्लाला ११-८, ७-११, ११-९, ५-११, ११-३ असे हरवले.

Story img Loader