बॉक्सिंग: पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी मेरी कोम ही भारताची पहिली महिला बॉक्सर ठरली आहे. फ्लायवेट गटात कझाकस्तानच्या झाईना शेकेर्बेकोव्हा हिचा सहज पाडाव करत मेरीने सुवर्णपदकावर नाव कोरले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने शेकेर्बेकोव्हा हिच्यावर २-० अशी आरामात मात केली. दोन्ही डावखुऱ्या बॉक्सर्समध्ये रंगलेल्या या अंतिम फेरीत मेरी कोम पहिल्या फेरीत पिछाडीवर पडली होती. पंचांनी शेकेर्बेकोव्हाच्या बाजूने कौल दिला होता. पण दुसऱ्या फेरीत ‘मॅग्निफिसंट मेरी’ने जोमाने पुनरागमन करत शेकेर्बेकोव्हा हिच्यावर वर्चस्व गाजवले. पुढील दोन्ही फेऱ्यांमध्ये मेरी कोमच्या पंचेसचा जलवा पाहायला मिळाला.
‘‘आशियाई स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळाल्याने मी भलतीच खूश झाली आहे. गेल्या आशियाई स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले होते. कौटुंबिक जीवनाचा त्याग करून, मुलांकडे दुर्लक्ष करून मी बॉक्सिंगमध्ये अविरत मेहनत घेतली होती. त्याचे फळ मला मिळाले. मी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावेन, अशी खात्री माझ्या चाहत्यांना होती. आता तीन मुलांची आई झाल्यानंतरही मी आशियाई विजेती बॉक्सर ठरली आहे,’’ असे मेरी कोमने सांगितले.
‘‘राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत पिंकी जांगराकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मला मिळाली. या सुवर्णपदकासाठी मी अधिक मेहनत घेतली होती. आता देशवासीयांसाठी सुवर्णपदक पटकावल्यानंतर मी समाधानी आहे.’’ अंतिम लढतीबाबत मेरी कोम म्हणाली, ‘‘कझाकस्तानची बॉक्सर बलाढय़ होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मला क्षमतेनुसार साजेशी कामगिरी करता आली नाही. शेकेर्बेकोव्हा खूपच वेगवान आणि शारीरिकदृष्टय़ा कणखर होती. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत मी जोरदार पंचेस लगावत तिला नामोहरम केले. आता नोव्हेंबरमध्ये कोरियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मी तयारी करणार असून, रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे माझे पुढील उद्दिष्ट असणार आहे.’’
व्हॉलीबॉल: महिलांचे आव्हान संपुष्टात
अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताला जपानकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला, या पराभवामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
भारताने पहिला सेट २५-२० असा २४ मिनिटांमध्ये जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये जपानने सामन्यात दमदार पुनरागमन केले, त्यांनी २३ मिनिटांमध्ये २५-१९ असा जिंकत बरोबरी केली. भारताने तिसरा सेट २५-२३ असा जिंकत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली, पण चौथ्या सेटमध्ये जपानने जोरदार आक्रमण केले आणि सेट २५-२० असा जिंकत सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. पाचवा आणि निर्णायक सेट जपानने १५-१३ असा जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तायक्वांडो: पदरी पराभव
आतापर्यंतच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताने तायक्वांडोमध्ये निराशाच केली असून, बुधवारीही भारताने पराभवाचेच पाढे वाचले. आरती खाकल आणि राजन पंडिया आनंद यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महिलांच्या ५७ किलो वजनी गटामध्ये कझाकिस्तानच्या गानिया अल्झाकने आरतीवर १५-८ असा विजय मिळवला. पहिल्या फेरीत आरतीने २-० अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये आरतीला आघाडी कायम राखता आली नाही.
पुरुषांमध्ये आनंदने कोरियाच्या प्रतिस्पध्र्याला चांगली लढत दिली, पण त्याला विजय मिळवता आला नाही. तिन्ही फेऱ्यांमध्ये त्याने प्रत्येकी एक गुण कमावला, पण तिसऱ्या फेरीमध्ये त्याला पाच गुणांसह सामनाही गमवावा लागला.
टेबल टेनिस: सौम्यजितची आगेकूच
भारताच्या सौम्यजित घोषने टेबल टेनिस स्पर्धेतील उपउपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र ऑलिम्पिकपटू शरद कमालचे आव्हान संपुष्टात आले.
घोषने लाओसच्या फाथापोनी थावीसाकवर ११-५, ११-७, ११-५, ११-४ अशी मात केली. त्याला उत्तर कोरियाच्या पाक सिन्हायोकशी खेळावे लागणार आहे. शरदला थायलंडच्या पादोसाक तानिविरीचाकुल याने पराभूत केले. रंगतदार लढतीत पादोसाकने ६-११, १२-१०, ५-११, ११-९, ६-११, १२-१०, ११-९ असा विजय मिळविला.
कुस्ती: ग्रीकोरोमनध्ये भारताची सपशेल निराशा
भारताच्या मल्लांनी ग्रीकोरोमन कुस्तीत सपशेल निराशा केली. संदीप यादव (६६ किलो), गुरप्रीतसिंग (७५ किलो), मनोजकुमार (८५ किलो) व धर्मेदर दलाल (१३० किलो) यांना आपापल्या गटात पदक मिळविण्याच्या फेरीतही स्थान घेता आले नाही. १३० किलो गटात इराणच्या बाशिक दार्झीने दलालचा ४-० असा सहज पराभव केला. ७५ किलो गटात कतारच्या बाखित बद्रने गुरप्रीतलाही ४-० असे नमविले. ८५ किलो गटात चीनच्या फेई पेंगने मनोजचा ३-० असा पराभव केला. संदीपला उजबेकिस्तानच्या खुशराव ओब्लोर्दियने एकतर्फी हरविले.
कनोइंग व कयाकिंग: भारतीय खेळाडूंची पीछेहाट
भारताच्या गणेश्री ध्रुव व चंपा मौर्य यांनी कयाकिंगमधील सिंगल्स विभागात अनुक्रमे पाचवे व सातवे स्थान मिळविले. कनोईंगमध्ये नमिता चंडेलला उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुषांच्या कयाकिंगमध्ये कुलदीप कीरला पात्रता फेरीतच गारद व्हावे लागले. प्रिन्स परमारलाही पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
‘मेरी’गोल्ड!
पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे.
First published on: 02-10-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2014 mary kom punches first boxing gold india add 1 silver 3 bronzes to tally