– पै. मतीन शेख

१८ व्या आशियाई खेळांचं बिगुल वाजलेलं असून रविवारपासून भारतासह आशिया खंडातील मातब्बर देश पदकांसाठी एकमेकांशी झुंजताना दिसतील. याआधीच्या लेखात आपण भारतीय पुरुष संघाची कुस्ती आणि सुशील कुमारच्या खेळाचा आढावा घेतला होता. या लेखात आपण भारताच्या महिला कुस्ती आणि साक्षी मलिक-विनेश फोगट या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.

साक्षी मलिकवर दडपण :

गेल्या दहा वर्षांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असणारी भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आशियाई स्पर्धेत ६२ किलो वजनीगटात उतरणार आहे. रिओ ऑलिम्पिक नंतर तिची कामगिरी फारशी चांगली नसली तरी समाधानकारक राहिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात दिल्लीत पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या कामगिरीनंतर साक्षीच्या चाहत्या वर्गाची निराशा झाली. ही निराशा दूर करुन आपली सर्वोत्तम कामगिरी सिद्ध करण्याच दडपण साक्षीवर नक्कीच असणार आहे.

साक्षीचा खेळ आणि तिच्या पुढील आव्हाने :

शारिरीक ताकदीवर लढणं आणि डाव मारणं हे साक्षीच्या कुस्तीचं प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सर्वसाधारणपणे दोन्ही पवित्र्यांमध्ये लढण्याकडे साक्षीचा भर असतो. सुरुवातीला आक्रमक लढत संधीनुसार कधी एकेरी तर कधी दुहेरी पट काढत ती प्रतिस्पर्धी खेळाडूवर आपला कब्जा करुन गुणांची वसुली करते. ‘कलाजंग’, ‘गदालोट’ या पारंपरिक डावांचा ती प्रयोग करते. बर्‍याचदा ती समोरच्या मल्लाला रोखुन बचावात्मक कुस्ती लढते, प्रतिस्पर्ध्याला हात चालवु देत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम आता बदललेले आहेत. नवीन नियमांनुसार साक्षीला तिच्या या नकारात्मक खेळाचा फटका बसू शकतो.

पहिल्याच डावात आपला सर्व जोर लावल्यानंतर साक्षी दुसऱ्या डावात थोडीशी थकते. अशा परिस्थितीत अनेकदा साक्षीने सामन्यावरील पकड ढिली केलेली आहे. साक्षीच्या कुस्तीमधला हा सगळ्यात मोठा विक पॉईंट आहे. मंगोलिया, चीन, जपान यांसारख्या देशांचे मल्ल या स्पर्धेत तिच्या या कच्च्या दुव्याचा फायदा उचलू शकतात. त्यामुळे साक्षीला सुवर्ण पदकापर्यंत पोहचायचं असेल तर तिला आपला दम शेवटपर्यंत टिकवुन लढणं गरजेचं आहे.

विनेश फोगट सुवर्ण पदकाची प्रमुख दावेदार :

रिओ ऑलिम्पिकमध्ये विनेशकडून पदकाची खुप मोठी आशा होती. पण चीनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढताना तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे विनेशला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. या मोठ्या दुखापतीतून सावरत विनेशने सध्या चांगलं कमबॅक केलयं. रिओ मधील हे मोठं नुकसान भरुन काढण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ४८ किलो वजनी गटापासून ते ५० किलो वजनी गटापर्यंत तिचा प्रवास थक्क करणारा आहे.  राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई चॅम्पियनशिप मध्ये ही तिने सुवर्ण पदक पटकलंय.

विनेशच्या खेळाची वैशिष्टय़े :

विनेशचा खेळ हा आक्रमक स्वरुपाचा होता. न थांबता लढणं हे तिचं मुळ वैशिष्ट्य होतं, पण सध्या तिने आपल्या खेळात बराच बदल केलेला आहे. समोरील खेळाडूच्या हालचाली व परस्थिती पाहुन ती आपले डावपेच आखते आहे. तिचा खेळ लवचिक व चपळ आहे. पटात सुर मारत पाठीवर जात ती गुणांची कमाई करते तसेच भारंदाज तर कधी एकचाक डाव मारत ती गुण मिळवण्याच्या प्रयत्नांत असते. जपान आणि चीनी प्रतिस्पर्ध्याचं प्रमुख आव्हान पेलुन विनेश सुवर्ण पदकाला नक्की गवसणी घालेल असं सध्या चित्र आहे.

या स्पर्धेत भारताच्या गिता, बबिता या धाकड गर्ल सहभागी नाहीयेत. याच बरोबर दिव्या काकरान ( ८६ किलो), पुजा ढंडा (५७ किलो), पिंकी (५३ किलो), किरण बिश्नोई (७६ किलो) या महिला कुस्तीपटू आपल्या गटांत प्रतिनिधीत्व करणार आहेत.