सुवर्णपदकाच्या आशेने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला मलेशियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी पराभवाची धूळ चारत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुवर्णपदकाचा सामना खेळला जाईल अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र उपांत्य सामन्यात जपानने पाकिस्तानला व मलेशियाने भारताला पराभवचा धक्का दिला. भारताकडून सामन्यात आकाशदीप आणि हरमनप्रीत सिंहने गोल केले. पाकिस्तानकडून  मोहम्मद आतिकने एकमेव गोल केला.

सुवर्णपदकाच्या आशेने स्पर्धेची सुरुवात केलेल्या भारताला कांस्यपदकासाठी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची पाळी आली. उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध झालेल्या पराभवाची मरगळ झटकत भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला. पहिल्याच सत्रापासून भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पाकचे खेळाडू बॅकफुटवर गेले. त्यातचं तिसऱ्या मिनीटाला ललित उपाध्यायने पाकिस्तानचा बचाव भेदत डी-एरियात प्रवेश केला. ललितने दिलेल्या पासवर आकाशदीप सिंहने गोल करुन भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली आक्रमण करुन भारताच्या गोटात खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या बचावफळीने त्यांची डाळ शिजू दिली नाही. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधीही आली होती. मात्र गोलकिपर श्रीजेशने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे मध्यांतरापर्यंत भारताकडे सामन्यात १-० अशी आघाडी होती.

कांस्यपदकासाठीच्या या सामन्यात पाकिस्तानसाठी पेनल्टी कॉर्नर निर्णयाक बाब ठरली. तिसऱ्या सत्रापर्यंत पाकिस्तानला ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात पाकिस्तानचे खेळाडू अयशस्वी ठरले. तिसऱ्या सत्रात भारताने मात्र भक्कम बचाव करत आपली १-० ही आघाडी कायम राखली. मनजीत सिंह, चिंगलीन साना यांनी बचावात चांगली कामगिरी पार पाडली.

चौथ्या सत्रात पाकिस्तानचा संघ आक्रमण करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार याचा अंदाज घेत भारताने अखेरच्या सत्रात खेळाची गती कमी केली. या प्रयत्नात भारताच्या काही खेळाडूंकडून क्षुल्लक चुकाही झाल्या. मात्र भारतीय बचावफळीने पाकिस्तानला या चुकांचा फायदा घेण्याची संधीच दिली नाही. चौथ्या सत्रात भारताला सामन्यातला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा पुरेपूर फायदा घेत हरमनप्रीत सिंहने ५० व्या मिनीटाला भारताची आघाडी २-० ने वाढवली. यानंतर सामना हातातून निसटत चाललेला पाहून पाकिस्तानने आपल्या आक्रमणाची गती वाढवली. यावेळी भारताच्या बचावफळीकडून झालेल्या एका छोट्याश्या चुकीचा फायदा घेत पाकिस्तानच्या  मोहम्मदने आतिकने आपल्या संघाचा पहिला गोल नोंदवला. यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती, मात्र रुपिंदरपालने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला.

Story img Loader