भारतीय हॉकी संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. जपानवर ८-० ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. १९८२ साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती. झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ गोलची नोंद केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत ५१ गोलची नोंद केली आहे.

आशियाई स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यास भारतीय संघाला २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी सामन्यात भारतीय संघासमोर मोठं आव्हान नसलं तरीही पुढच्या फेरीत भारताला मलेशिया, पाकिस्तान यांच्यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागू शकतो. २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानवर पेनल्टी शूटआऊटवर मात करुन विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे भारतीय संघ आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader