इंडोनेशियात सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये भारतीय हॉकी संघाने आपल्या सर्वोत मोठ्या विजयाची नोंद केली आहे. साखळी सामन्यात हाँगकाँग विरुद्ध खेळताना भारताने तब्बल २६ गोलची नोंद केली. याआधी १९३२ साली लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेवर २४-१ ने मात केली होती. एशियाडच्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान इंडोनेशियाचा १७-० या फरकाने पराभव केला होता.
संपूर्ण सामन्यावर भारतीय खेळाडूंनी एकहाती वर्चस्व गाजवलं. हाँगकाँगचे खेळाडू कोणत्याही तुलनेत भारताच्या बरोबरीत दिसत नव्हते. या सामन्यात भारताच्या ४ खेळाडूंनी हॅटट्रिकची नोंद केली. भारताकडून आकाशदीप सिंहने ३, मनप्रित सिंहने २, रुपिंदरपाल सिंहने ३, एस.व्ही.सुनीलने २, विवेक सागर प्रसादने १, ललित उपाध्यायने ३, मनदीप सिंहने २, अमित रोहिदासने १, हरमनप्रीत सिंहने ४; तर वरुण कुमार, दिलप्रीत सिंह, चिंगलेनसाना, सिमरनजीत सिंह, सुरिंदर सिंह यांनी प्रत्येकी १-१ गोल झळकावला.