भारतीय टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानच्या जोडीवर मात केली.

कझाकिस्तानच्या डेनिस येवस्येव आणि अलेक्झांडर बब्लिक यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. दोन्ही खेळाडूंना रोहन आणि दिवीजने पुनरागमन करण्याची संधी दिलीच नाही. अखेर ६-३ च्या फरकाने पहिला सेट जिंकत भारतीय जोडीने सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये कझाकिस्तानच्या जोडीने भारतीय जोडीला चांगली टक्कर दिली. बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीला जोरदार प्रत्युत्तर देत कझाकिस्तानच्या खेळाडूंनी सेटमध्ये २-२ अशी बरोबली साधली. यावेळी रोहन बोपण्णाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सामन्यावरील आपली पकड ढिली होणार नाही याची काळजी घेतली. अखेर दुसरा सेट ६-४ च्या फरकाने खिशात घालत भारतीय जोडीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

Story img Loader