आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. बॅडमिंटन महिला सांघिक प्रकारातील पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर २१-१८, २१-१९ अशी मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

अपेक्षेप्रमाणे सेटच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली झुंज पहायला मिळाली. काही क्षणांनंतर यामागुचीने आपल्या ताकदवान फटक्यांचा वापर करत सिंधूला मागे टाकलं. पहिल्या सेटच्या मध्यांतरानंतरही यामागुचीकडे ३ गुणांची आघाडी होती. मात्र सेटच्या उत्तरार्धात सिंधूने आपल्या खेळाचा गिअर बदलत जोरदार पुनरागमन केलं. आपल्या ठेवणीतल्या स्मॅश फटक्यांचा वापर करत सिंधूने पहिला सेट २१-१८ च्या फरकाने खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्येही अपेक्षेप्रमाणे दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही खेळाडू एकमेकींना पुढे जाण्याची संधी देत नव्हत्या. यादरम्यान सिंधूने काही आक्रमक फटके खेळत यामागुचीला मात देण्याचा प्रयत्न केला. याला यामागुचीनेही ड्रॉपचे सुंदर फटके खेळत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मध्यांतरापर्यंत यामागुचीने सामन्यात एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली. मध्यांतरानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत बरोबरी साधली. अखेरच्या क्षणापर्यंत दोघींमधला हा सामना १९-१९ असा बरोबरीत होता. मात्र मोक्याच्या क्षणी सिंधूने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत यामागुचीला चूक करायला भाग पाडत सेट २१-१९ ने खिशात घातला.

Story img Loader