एकेकाळी भारतीय हॉकी संघाचा कणा मानला जाणाऱ्या सरदार सिंहने आशियाई खेळांसाठी भारतीय संघात आपली जागा परत मिळवली आहे. माजी प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी सरदारला अनफिट असल्यामुळे संघाबाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र त्याचा अनुभव पाहता सध्याचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी संघाला पुन्हा एकदा स्थान दिलं आहे. यानंतर सरदार आपल्या फिटनेसवर चांगलंच लक्ष देतो आहे. आगामी एशियाड आणि विश्वचषकाच्या तयारीसाठी सरदार सध्या सरावासोबत व्यायामावरही भर देतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे सरदारने यो-यो फिटनेस टेस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.
सरदारने यो-यो फिटनेस चाचणीत आपल्याच नावावर असलेला (२१.३) गुणांचा विक्रम मोडीत काढला आहे. २१.४ अशा सर्वोत्तम गुणांची नोंद करत सरदारने विराट कोहलीलाही धोबीपछाड दिला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत यो-यो फिटनेस चाचणीत १९ गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियात जागा मिळवायची असल्यास बीसीसीआयने सर्व खेळाडूंना यो-यो फिटनेस चाचणी देणं बंधनकारक केलं आहे. किमान १६.१ गुणांची कमाई केल्यानंतर खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळते. त्यामुळे यंदाच्या आशियाई खेळांमध्ये सरदार सिंह कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.