हांगझू (चीन)
चीनविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी आज, गुरुवारी बांगलादेशवर विजय आवश्यक आहे.
अगदी ऐनवेळी संघ जाहीर झाल्यानंतर कुठल्याही सराव आणि विश्रांतीशिवाय चीनमध्ये दाखल झालेल्या भारतीय फुटबॉल संघास लगेचच मैदानात उतरावे लागले होते. याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला आणि पहिल्या सामन्यात भारताला चीनकडून १-५ असा मोठा पराभव पत्करावा लागला. अ-गटात आता भारताचा सामना बांगलादेशशी होणार असून, प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या भारतीय संघाला बाद फेरी प्रवेशाच्या आशा कायम राखायण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.
हेही वाचा >>> Asian Games Live Streaming: ४० खेळ, ४८१ स्पर्धा अन् १००० हून अधिक पदके; हे सर्व सामने कधी, कुठे पाहायला मिळतील? जाणून घ्या
फुटबॉलच्या मैदानावर आतापर्यंत बांगलादेश संघाने नेहमीच भारतापुढे आव्हान उपस्थित केले आहे. त्यात बांगलादेशाला पहिल्या सामन्यात म्यानमारकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे तेही अधिक त्वेषाने या सामन्यात खेळतील. ‘व्हिसा’ अडचण दूर झाल्यावर चिंग्लेनसना सिंह भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे भारताच्या बचाव फळीची ताकद कागदावर तरी वाढलेली दिसेल.
‘‘मला चीनविरुद्ध तगडा भारतीय संघ घेऊन खेळायला आवडले असते. या तिसऱ्या किंवा चौथ्या पसंतीच्या संघाकडून फारशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. संघ निवडीस झालेला उशीर, सरावाचा अभाव, प्रवासाचा ताण अशा अडचणींवर मात करून या संघाने चीनविरुद्ध पहिली ४५ मिनिटे चांगला खेळ केला,’’ अशी प्रतिक्रिया स्टिमॅच यांनी चीनविरुद्धच्या पराभवानंतर दिली होती. ‘‘हा सामना बरोबरीत सोडवणे अशक्य असल्याचे मला माहीत होते. हातात दर्जेदार संघ नसताना मी काहीच करू शकत नाही. आमच्याकडे केवळ तीनच बदली खेळाडू उपलब्ध होते. यात काय योजना आखणार?’’ असा स्टिमॅच यांचा नकारात्मक सूर होता. आता प्रशिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळाडूंना प्रोत्साहन न दिल्यास भारताला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवणे अवघड जाईल.
’ वेळ : दु. १.३० वाजता
’ थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ५, सोनी लिव्ह अॅप
नौकानयनमध्ये यशस्वी सुरुवात
भारताच्या अर्जुनलाल जाट आणि अरिवद सिंह जोडीने नौकानयनात यशस्वी सुरुवात केली असून, डबल स्कल प्रकारात या जोडीने पात्रता फेरीतील शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला. या जोडीकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत.
हरमनप्रीत, लवलिना ध्वजवाहक
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या २३ सप्टेंबरला (शनिवार) होणाऱ्या उद्घाटन सोहळय़ासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ऑलिम्पिक पदकविजेती बॉिक्सगपटू लवलिना बोरगोहेन यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) दोन ध्वजवाहक नेमण्याचा बुधवारी निर्णय घेतला. यंदाच्या स्पर्धेत ६५५ भारतीय खेळाडू सहभाग नोंदवणार असून भारताचे हे आजवरचे सर्वात मोठे पथक आहे.
भारतीय संघात सुनील छेत्री आणि संदेश झिंगन हे दोनच अनुभवी खेळाडू असून, अन्य खेळाडूंच्या गाठीशी फारसा अनुभव नाही. त्यामुळे गोल करण्याचा पूर्ण भार हा छेत्रीवर आहे.
भारताचे आजचे वेळापत्रक
* महिला क्रिकेट
वि. मलेशिया (उपांत्य फेरी)
वेळ : सकाळी ६.३० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस १, ३, ४
* महिला फुटबॉल
वि. चायनीज तैपेई
वेळ : सायं. ५ वा.