Asian Games 2023, Mirabai Chanu Injured: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्याने पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याने सांगितले की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिला ‘वॉर्म अप’ करताना वेदना जाणवत होत्या, त्यानंतर तिच्या प्रशिक्षकाने तिला स्पर्धेतून माघार घेण्याचा सल्ला दिला.
तिने प्रशिक्षकाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि सराव सुरूच ठेवला कारण तिला देशासाठी पदक जिंकायचे होते. मात्र, स्पर्धेदरम्यान मीराबाईला खूप मोठी दुखापत झाली आणि त्यानंतर प्रशिक्षकांनी तिला उचलून बाहेर नेले. स्पर्धेनंतर चानू म्हणाली, “जेव्हा मी स्नॅच फेजच्या आधी वॉर्मअप करत होते, तेव्हा मला मांडीत खूप दुखत होते. त्यावेळी मी वेदना कमी करण्यासाठी बर्फ आणि स्प्रे वापरत होते. मी प्रशिक्षकांना सांगितले की, आपण भारतात गेल्यावर यावर कसा उपचार करता येईल ते आपण नंतर पाहू. मला आधी हे वजन उचलायचे आहे आणि भारतासाठी मेडल जिंकायचे आहे. मला त्यावेळीही खूप वेदना होत होत्या आणि आताही वेदना होत आहेत.”
चानूने एकूण १९१ किलो (८३ किलो + १०८ किलो) वजन उचलले ज्यामुळे ती चौथ्या स्थानावर राहिली. ती म्हणाली, “माझे मांडीचे स्नायू आणि उजव्या बाजूच्या हाडांमध्ये हा त्रास होत आहे.” मणिपूरच्या या खेळाडूने सांगितले की, “मी कठोर प्रशिक्षण घेतले होते पण या दुखण्यामुळे पदक जिंकू शकले नाही. देशासाठी पदक जिंकण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटतंय.”
मीराबाई चानू पुढे म्हणाली, “मी २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकलो नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते पण ते आता पूर्ण होताना दिसत नाही. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे.” ती पुढे म्हणाली, ”स्नॅच वॉर्म-अप दरम्यान वेदना सुरू झाल्या. सर (विजय शर्मा) यांनी मला विचारले की मी स्पर्धेतून माघार घेऊ शकते कारण, त्यामुळे गंभीर दुखापत टाळता येऊ शकते पण मी पदकाच्या आशेने खेळत राहिलो. वेदना असूनही, मी किमान कांस्य पदक जिंकण्यासाठी क्लीन अँड जर्कमध्ये ११७ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. पुढच्या वेळी यावर आणखी मेहनत घेईन. मी सर्व भारतीयांची माफी मागते आणि आभारही मानते की त्यांनी मला खूप मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.”