Asian Games 2023, Hockey: आशियाई खेळ २०२३चे आयोजन चीनमध्ये होत आहे. जिथे भारतातील अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अप्रतिम कामगिरी करत पदकाचे खातेही उघडले आहे. याशिवाय भारतीय संघाने हॉकीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात हॉकी सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला आहे. भारताच्या फॉरवर्ड खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या सामन्यात टीम इंडियाने उझबेकिस्तानचा १६-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा २०२३मध्ये शानदार सुरुवात केली आहे. ‘अ’ गटातील पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा दारूण पराभव केला. चीनच्या हांगझाऊ प्रांतात सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सामन्यात रविवारी उझबेकिस्तानने भारतीय हॉकी संघासमोर सपशेल शरणागती पत्करली. गोंगझू कॅनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर टीम इंडियाने उझबेकिस्तानला धोबीपछाड देत ग्रुपमध्ये पहिले स्थान पटकावले.
भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूंनी गोल केले
उझबेकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ८ गोल हे वेगवेगळ्या खेळाडूंनी केले. त्यापैकी तीन खेळाडूंनी भारतासाठी हॅट्ट्रिक गोल केले. भारताकडून ललित उपाध्याय (७’, २४’, ३७’, ५३’), वरुण कुमार (१२’, ३६’, ५०’, ५२’), अभिषेक (१७’), मनदीप सिंग (१८’, २७’, 28) ‘) अमित रोहिदास (38′), सुखजीत (४२’), शमशेर सिंग (४३’) आणि संजय (५७’) यांनी गोल केले. या विजयासह तीन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारताने पुरुष हॉकी पूल अ मध्ये पहिल्या स्थानावर मजल मारली आहे. प्रत्येक पूलमधून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
कसा झाला सामना?
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ गेल्या महिन्यात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावल्यानंतर हांगझाऊ एशियन गेम्समध्ये आला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगशिवाय सुरुवात करूनही भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक वृत्ती स्वीकारली आणि जागतिक क्रमवारीत ६६व्या क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानचा पराभव केला. सामन्याच्या सात मिनिटांनंतर ललित उपाध्यायने पेनल्टी कॉर्नरवर उझबेकिस्तानच्या गोलरक्षकाला हरवून भारताची धावसंख्या १-० अशी केली. काही मिनिटांनी वरुण कुमारने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवरून भारताची आघाडी दुप्पट केली. पहिल्या क्वार्टरचा स्कोअरबोर्ड २-० असा भारताच्या बाजूने झाला.
भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले आणि अभिषेक आणि मनदीप सिंगच्या माध्यमातून दोन झटपट मैदानी गोल केले. ललित उपाध्यायने त्याचा दुसरा आणि संघाचा पाचवा गोल जवळून अगदी सहज केला. त्यानंतर मनदीप सिंगनेच दोन मिनिटांत दोन गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि हाफ टाइमला भारताने ७-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर भारताने आणखी ९ गोल केले आणि सामना १६-० असा जिंकला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा पुढील सामना मंगळवारी सिंगापूरशी होणार आहे. आशियाई खेळ २०२३ मधील पुरुषांची हॉकी स्पर्धा ही देखील ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्वाची आहे, ज्यामध्ये सुवर्ण विजेता संघ पॅरिस २०२४ साठी पात्र ठरेल.