Asian Games 2023: चीनमधील हांगझाऊ शहरात सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी अ‍ॅथलेटिक्समधील पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कार्तिक कुमारने २८:१५:३८ या वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर गुलवीरने २८:१७:२१ या वेळेसह कांस्यपदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समधील म्हणजे ट्रॅक आणि फील्डमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी सहाव्या दिवशी किरण बालियानने महिलांच्या शॉट पुट प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण १० सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय १४ रौप्य आणि १४ कांस्यपदकेही जिंकली असून, त्यानंतर एकूण पदकांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे. सध्या, भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये भालाफेक स्पर्धेत सर्वांच्या नजरा नीरज चोप्रावर असतील.

आशियाई खेळ २०२३च्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची कामगिरी दिसून आली. भारताच्या सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यासह या स्पर्धेतील भारताचे पदकही निश्चित झाले आहे.

बॅडमिंटनमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.

स्क्वॉशमध्ये पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले

सौरव घोषालच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष स्क्वॉश संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध २-१ अशा रोमहर्षक पद्धतीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याआधी सकाळी भारताने मिश्र दुहेरी टेनिसचा सुवर्णपदक सामनाही जिंकला होता.

हेही वाचा: Asian Games, IND vs PAK Hockey: लहरा दो…! टीम इंडियापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, एकतर्फी सामन्यात १०-२ने भारताचा ऐतिहासिक विजय

लव्हलिनाने पदक निश्चित केले

आज दोन भारतीय बॉक्सर्सनी आपली पदकं पक्की केली आहेत. प्रितीपाठोपाठ लव्हलिनानेही कोरियन बॉक्सरविरुद्धचा आपला सामना सहज जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून आपले पदक निश्चित केले. प्रीतीने ५४ किलो आणि लोव्हलिनाने ७५ किलो वजनी गटात पदक मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2023 india won two medals in 10 thousand meter race karthik and gulveer created history avw