Equestrian Dressage Team Wins Gold : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या तिसऱ्या दिवशी भारताने तिसरं सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताच्या घोडेस्वार संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय घोडेस्वार सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंह, अनुष अग्रवाला आणि हृदय छेडा या चौघांच्या संघाने चकमदार कामगिरी करत सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत या चौघांनी सर्वाधिक २०९.२०५ गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. अंतिम फेरीत दिव्यकीर्तीला ६८.१७६, हृदयला ६९.९४१ आणि अनुशला ७१.०८८ गुण मिळाले. रौप्य पदकावर समाधान मानावं लागलेल्या चीनच्या संघापेक्षा भारतीय संघाने ४.५ गुण अधिक मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९८२ साली दिल्लीत खेळवण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी या क्रीडा प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे. गेल्या ४१ वर्षांपासून या विभागात भारताच्या सुवर्णपदकाची पाटी कोरी आहे.

घोडेस्वार संघाने पटकावलेल्या सुवर्णपदकाच्या जोरावर भारताने गुणतालिकेत सहावं स्थान पटकावलं आहे. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य पदकं पटकावली आहेत. सोमवारी (२५ सप्टेंबर) भारताच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावलं. तर आज घोडेस्वार संघाने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

नेमबाजीत सुवर्ण

रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पन्वर आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्या भारतीय संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. सोमवारी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत एकूण तीन पदके मिळाली. वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने चुरशीच्या लढतीनंतर शूट-ऑफमध्ये कांस्यपदक पटकावलं. पाठोपाठ पुरुषांच्याच २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात भारताने कांस्यपदक पटकावलं.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे खाते उघडून देताना ठाणेकर रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश आणि ऐश्वर्य या त्रिकुटाने पात्रता फेरीतच १८९३.७ गुणांसह चीन आणि दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान परतवून लावले. रुद्रांक्षने यापूर्वी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2023 indian equestrian dressage team bags gold after 41 years sudipti hajela divyakriti singh asc