हांगझू : एक डोळा सुवर्णपदकावर आणि दुसरा ऑलिम्पिक पात्रतेकडे ठेवत भारतीय पुरुष हॉकी संघ आज, रविवारपासून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेस सुरुवात करणार आहे. दुबळय़ा उझबेकिस्तानविरुद्ध भारताची सलामीची लढत होणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी असून, या स्पर्धेत सर्वात वरचे मानांकन असलेला संघ आहे.
अनुभव, आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपद आणि पुरेसा सराव यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाकडून जेतेपदाचीच अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज; कामगिरी उंचावण्यासाठी श्रेयसवर दडपण
इंडोनेशियात झालेल्या गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या वर्षी मायदेशात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ नवव्या स्थानावर राहिला. या निराशाजनक कामगिरीनंतर प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांची हकालपट्टी करण्यात आली आणि क्रेग फुल्टन यांनी त्यांची जागा घेतली. नवे प्रशिक्षक, नवे नियोजन याच्यासह भारतीय संघाने झपाटय़ाने प्रगती केली. त्यामुळे भारतीय संघांकडून असणाऱ्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
‘‘ऑलिम्पिक पात्रता हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे प्रशिक्षक फुल्टन म्हणाले. भारत या स्पर्धेतून पारंपरिक आक्रमक नियोजनातून बाहेर पडणार असे फुल्टन यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा बचाव नजरेत भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कर्णधार हरमनप्रीत सिंगचे पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचे कौशल्य ही भारतीय संघाची मुख्य ताकद असेल.
भारताचे पुढील सामने
’सिंगापूर (२६ सप्टेंबर)
’जपान (२८ सप्टेंबर)
’पाकिस्तान (३० सप्टेंबर)
’बांगलादेश (२ ऑक्टोबर)
वेळ : सकाळी ८.४५ वा.