Asian Games 2023, Harmanpreet Kaur: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच एशियाडमध्ये आपले आव्हान सादर करणार आहे. स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. महिला क्रिकेटचे सामने १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. बीसीसीआयने नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवण्याची घोषणा केली. याआधी गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला संघाने हजेरी लावली होती. त्यानंतर त्याने रौप्यपदक जिंकले होते.
भारत प्रथमच आपला क्रिकेट संघ पाठवत आहे
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०१० आणि २०१४ च्या गेम्समध्ये एक क्रिकेट इव्हेंट देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे BCCI ने पुरुष किंवा महिला संघ पाठवला नाही. २०१०च्या गेम्समध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकले. २०१४ मध्ये श्रीलंकेने पुरुष गटात आणि पाकिस्तानने महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते.
गेल्या वर्षीच १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या, मात्र चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हे खेळ पुढे ढकलण्यात आले होते. एकूणच आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये तिसऱ्यांदा होणार आहेत. चीनची राजधानी बीजिंगने १९९० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते, तर ग्वांगझूला २०१० मध्ये या प्रतिष्ठेच्या खेळाचे आयोजन करण्याची संधी मिळाली.
महिला संघाची घोषणा
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. महिला संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. सर्व प्रमुख खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या स्पर्धा २८ सप्टेंबरपासून, तर महिलांच्या स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. दोन्ही क्रिकेट स्पर्धा टी२० फॉरमॅटमध्ये आयोजित केल्या जातील.
काय म्हणाले बीसीसीआय?
संघाची घोषणा करताना, बीसीसीआयने ट्वीटरवर लिहिले की, “महिला निवड समितीने १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३या कालावधीत झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेंग क्रिकेट फील्ड येथे होणाऱ्या १९व्या आशियाई खेळ २०२२साठी भारताच्या संघाची निवड केली आहे. महिला क्रिकेट स्पर्धा १९ पासून होणार आहे.”
आशियाई खेळांसाठी महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कानू मणी, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.
स्टँडबाय खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.