आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास अवघे तीन दिवस बाकी असताना भारताच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ जुलै रोजी या स्पर्धेसाठी महिला आणि पुरुष संघांची घोषणा केली होती. परंतु, या संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन दुखापग्रस्त खेळाडूंच्या जागी इतर दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त गोलंदाज शिवम मावी हा पुरुष संघातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी जलदगती गोलंदाज आकाश दीप याला संघात संधी देण्यात आली आहे. तर महिलांच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त अंजली सरवानी हिच्या जागी अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकार हिचा संघात स्थान समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडिया पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा हे स्टार खेळाडूही भारतीय संघात आहेत. या तिन्ही खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.

२०१० आणि २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बीसीसीआयने काही कारणास्तव संघ पाठवला नव्हते. यावेळी पुरुषांची आयसीसी क्रिकेट स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्या तारखा सारख्याच असल्याने बीसीसीआयची मोठी अडचण झाली होती. यंदाही भारताच्या विश्वचषकाच्या तयारीत या सर्व तारखा अडसर ठरत होत्या. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवले जाणार नाही. म्हणूनच युवा ऋतुराजच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळवळला जाणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघात समावेश केलेला नाही.

आयोजकांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळ सहभागी करून घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ कधीच पाठवले नाहीत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकलं आहे आणि महिलांमध्ये, पाकिस्तानने दोन्ही वेळा सुवर्णपदक जिंकलं आहे.

२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्था खेळवली जाणार आहे. तर महिला संघाचे सामने १९ तारखेपासून सुरू होणार आहेत. क्रिकेटचे सामने २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. तर पुरुष संघाचे सामने २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान खेळवले जातील.

हे ही वाचा >> आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारताचे ध्येय!

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा पुरुष संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्रकार

स्टँडबाय : हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सैका इशाक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2023 shivam mavi ruled out akash deep replacement pooja vastrakar added womens team asc
Show comments