हॉकी
रुपिंदरपाल सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने श्रीलंकेचा ८-० असा धुव्वा उडवत आशियाई स्पर्धेची थाटात सुरुवात केली. रुपिंदरपालने १२व्या, ४५व्या आणि ४६व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. रमणदीप सिंगने २८व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल लगावत त्याला चांगली साथ दिली. दानिश मुज्तबा, के. चिंगलेनसाना सिंग आणि रघुनाथ रामचंद्र यांनीही भारताच्या विजयात योगदान दिले.
सेऊन्हाक हॉकी स्टेडियमवर झालेल्या ब गटातील या सामन्यात मुज्तबाने सहाव्या मिनिटालाच भारताचे खाते उघडले. त्यानंतर रुपिंदरपालने पेनल्टीवर गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. रघुनाथच्या गोलमुळे भारताने १३व्या मिनिटाला ३-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात चिंगलेनसानाने चौथा गोल लगावला. त्यानंतर रमणदीपने भारताची आघाडी ५-०ने वाढवली. सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना रमणदीपने दुसरा गोल झळकावला. त्याआधी रुपिंदरपालने दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल लगावत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली होती. भारताचा पुढील सामना २३ सप्टेंबरला ओमानशी होणार आहे.
माघार घेतल्यामुळे भारताला दंड
स्पर्धेतील काही खेळांमधून ऐनवेळी माघार घेतल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (आयओए) आशियाई स्पर्धा समितीने दहा हजार अमेरिकन डॉलर्सचा (सहा लाख रुपये) दंड ठोठावला आहे. मात्र भारतीय पथकाचे प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी आपल्याला या कारवाईबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले.
अखिल भारतीय टेनिस महासंघाचे मुख्य अनिल खन्ना यांनी ही कारवाई मागे घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘‘रग्बी खेळातून पुरुष संघाने माघार घेतली व अन्य एका खेळातून भारताने माघार घेतल्यामुळे ही कारवाई झाली आहे. आम्ही संयोजन समितीला आमच्या अडचणी समजावून सांगितल्या आहेत.’’ भारताने या स्पर्धेसाठी ७२२ जणांचा चमू पाठवला आहे.
कोरियाकडून हार
हँडबॉल
भारतीय हँडबॉल संघाला यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. कोरियाने भारतावर ३९-१९ अशी मात केली. मध्यंतराला भारतीय संघ
६-२१ असा पिछाडीवर होता. कोरियाच्या संघाने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले. द. कोरियाच्या ह्य़ायुनसुक लीने आठ गोल केले.
पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
टेनिस
भारतीय पुरुष टेनिस संघाने नेपाळचा ३-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात मजल मारली आहे. युवा टेनिसपटू युकी भांब्रीने एकही गेम न गमावता जीतेंद्र परियारचा ६-०, ६-० असा फडशा पाडला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सनम सिंगने अभिषेक बस्टोला ६-०, ६-१ असे निष्प्रभ केले. दुहेरीमध्ये दिवीज शरण आणि साकेत मायनेनी या जोडीने संतोष खत्री आणि सोनम दावा यांचा अवघ्या ३५ मिनिटांमध्ये ६-०, ६-० अशी दाणादाण उडवली. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना कझाकिस्तानबरोबर होणार आहे.
सौदी अरेबियाची भारतावर मात
बास्केटबॉल
दमदार सलामी देणाऱ्या भारतीय बास्केटबॉल संघाला ‘ब’ गटातील पात्रता फेरीतील अटीतटीच्या सामन्यात सौदी अरेबियाकडून ७३-६७ असा पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या पहिल्या तिन्ही सत्रांवर सौदीने वर्चस्व राखले होते. चौथ्या आणि अखेरच्या पाचव्या सत्रामध्ये भारताने दमदार पुनरागमन केले, पण त्यांना विजयाची चव मात्र चाखता आली नाही. भारताचा पात्रता फेरीतील अजून एक सामना सोमवारी कझाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतातर्फे अमृतपाल सिंग आणि अमज्योत सिंग यांनी प्रत्येकी १९ गुण पटकावले.
अंतिम फेरीसाठी सौरभ अपात्र
जलतरण
भारतीय जलतरणपटूंना सहभागी झालेल्या तिन्ही प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. पुरुषांच्या २०० मी फ्रीस्टाइल प्रकारात सौरभ संगवेकरने १ मिनिट, ५३ सेकंदात अंतर पूर्ण केले. त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १०० मी बॅकस्ट्रोक प्रकारात मधू नायरला सातवे तर २०० मी बटरफ्लाय प्रकारात अ‍ॅग्नेल डिसुझाने चौथे स्थान मिळवले.
देबरोह, मोहन यांची निराशा
सायकलिंग
भारताचे सायकलिंगपटू देबरोह आणि मोहन महिथा यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे नवव्या आणि अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ट्रॅक सायकलिंगमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
अंतिम फेरीसाठी श्रुती पात्र
अश्वारोहण
श्रुती वोरा आणि नाडिया हरिदास या दोन महिला खेळाडूंनी अश्वारोहणातील वैयक्तिक प्रकारात सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत अंतिम फेरीसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. पहिल्या फेरीच्या लढतीत श्रुती आणि नाडिया यांनी सर्वोत्तम १५ खेळाडूंमधून अंतिम फेरीत स्थान मिळवले. शुभश्री राजेंद्र आणि वनिता मल्होत्रा यांना अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही.

Story img Loader