अवाढव्य स्टेडियम्स आणि दिखाऊ शक्तिप्रदर्शन टाळत दक्षिण कोरियातील इन्चॉन नगरी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नटली आहे. ऑलिम्पिकनंतर सर्वात जास्त प्रतिष्ठा असणाऱ्या या स्पर्धेच्या सतराव्या आवृत्तीसाठी जय्यत तयारी झाली असून, पुढील १४ दिवस ३६ विविध खेळांच्या अव्वल क्रीडापटूंमध्ये मुकाबला रंगणार आहे.
यजमानपदाच्या शर्यतीत इन्चॉन शहराने दिल्लीला मागे टाकून आयोजनाचा मान मिळवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची धुरा सांभाळणारे इन्चॉन हे सेऊल आणि बुसान यांच्यानंतरचे तिसरे शहर ठरणार आहे. आकर्षक रंगांमधले तीन जलचर प्राणी आशियाई स्पर्धेचे शुभंकर आहेत. बरामे, च्युम्युरो आणि विच्युऑन अशी त्यांची नावे आहेत. कोरियन भाषेनुसार या शब्दांचा अर्थ वारा, नृत्य आणि प्रकाश असा होतो.
१.६२ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करण्यात येणार आहे. स्पर्धासाठी ४९ विविध मैदाने तयार करण्यात आली असून, सरावासाठी ४८ केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४५ विविध देशांचे मिळून ९,४२९ क्रीडापटू स्पर्धेत आपले नैपुण्य सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर भारताने ९४२ सहभागी खेळाडूंची संख्या ६७९ वर आणत पथकाचा आकार मर्यादित केला आहे. हमखास पदक मिळवून देतील, अशा खेळाडूंना, संघांना प्राधान्य देण्यात आले आहे.अवघ्या महिन्याभरात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून दमदार प्रदर्शनाची अपेक्षा आहे, मात्र बलाढय़ चीनसह दक्षिण कोरिया, जपान यांचे आव्हान समोर असल्याचे पदकापर्यंतची वाटचाल खडतर होणार आहे.  
‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दिमाखदार प्रदर्शन केले. आशियाई स्पर्धेत मुकाबला कठीण आहे, मात्र आपण ७० पदकांची कमाई करू,’’ असा विश्वास भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक जिजी थॉमसन यांनी सांगितले.
नेमबाजी हे पदकांचे मुख्य आशास्थान आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा तसेच टेनिसपटू सानिया मिर्झा या रणरागिणींकडून देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे. प्रशासकीय तिढा सुटल्यानंतर भारतीय तिरंग्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने बॉक्सिंगपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. प्रो-कबड्डी लीगच्या निमित्ताने घराघरांत पोहचलेले कबड्डीपटू देशासाठी पदक जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. प्रतिस्पध्र्याना चीतपट करणारे कुस्तीपटू इन्चॉन नगरीत डंका पिटण्यासाठी तय्यार आहेत. लिएण्डर पेस, सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा यांच्या माघारीमुळे टेनिसमध्ये भारताचे आव्हान कमकुवत झाले आहे.
या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्यास रिओ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होण्याची संधी असल्याने भारतीय हॉकी संघ तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरसावला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये निराशा करणारा तिरंदाजीचा चमू आपले कर्तृत्व गाजवण्यासाठी आतुर आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर सराव शिबिरात सहभागी झालेले अ‍ॅथलिट्स या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत या मेहनतीचे रूपांतर पदकांमध्ये करण्यासाठी सज्ज आहेत.

Story img Loader