Asian Games 2023: हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. भारताच्या ॲन्सी सोजनने महिलांच्या लांब उडीत दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत ६.६३ मीटरची सर्वोत्तम उडी मारून रौप्यपदक जिंकले. ती पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या शिकी झिओंगपेक्षा १० मीटर मागे होती. लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी सहा प्रयत्न असतात आणि त्यातील सर्वोत्तम प्रयत्नांवर पदक निश्चित केले जातात.
सोजनने पाचव्या प्रयत्नात रौप्यपदक मिळवले
सोजनचा पहिला प्रयत्न ६.१३ मीटर होता. यानंतर तिने ६.४९ मीटर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नात सोजनने त्यात सुधारणा करत ६.५६ मीटर उडी मारली. चौथ्या प्रयत्नात तिला ६.३० मीटर उडी मारता आली. पाचव्या प्रयत्नात सोजनने आपली सर्व शक्ती पणाला लावत ६.६३ मीटर उडी मारून रौप्यपदक मिळवले. तिने सहाव्या प्रयत्नात सुवर्णपदक मिळवण्यासाठी उडी मारली, पण तिची उडी फाऊल झाली. त्याचवेळी सुवर्ण जिंकणाऱ्या चीनच्या शिकीचे सहा प्रयत्न पुढीलप्रमाणे; ६.६२ मीटर, ६.६० मीटर, ६.७३ मीटर, ६.६२ मीटर, ६.६२ मीटर आणि ६.३३ मीटर. भारताची आणखी एक ॲथलीट, शैली सिंग हिने ६.४८ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह या स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. हाँगकाँगच्या यान यू एन्गाने ६.५० मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या लांब उडीत पदक जिंकणारे खेळाडू
महिलांच्या लांब उडी प्रकारातील भारताचे हे आठवे पदक आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताला फक्त एक सुवर्णपदक मिळाले आहे, जे अंजू बॉबी जॉर्जने २००२ बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते. सोजन व्यतिरिक्त, नीना वरकिलने २०१८ जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, अंजू बॉबीने २००६ दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, मर्सी कुट्टनने १९८२ दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि एंजल मेरी जोसेफने १९७८च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. क्रिस्टीन फोरेजने १९६६च्या बँकॉक आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले आणि सिल्व्हियाने १९५१च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
ॲन्सी सोजन कोण आहे?
६.६३ मीटरची उडी ही सोजनची वैयक्तिक सर्वोत्तम उडी आहे. ही २२ वर्षीय ॲथलीट केरळमधील त्रिशूरची रहिवासी आहे. अनुप जोसेफ असे तिच्या वैयक्तिक प्रशिक्षकाचे नाव आहे. ती अजूनही शिकत आहे. सोजनने सातवीला असतानाच प्रशिक्षण सुरू केले. सुरुवातीच्या टप्प्यात तिचे प्रशिक्षक कन्नन मॅश होते. सोजनला तिच्या पालकांनी ॲथलीट बनण्याची प्रेरणा दिली, अन्यथा तिने तिच्या आयुष्यात वेगळं काही केलं असत. सोजन म्हणते, “मी माझ्या आई-वडिलांची आभारी आहे की त्यांनी मला लांब उडी खेळात ॲथलीट होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते दोघेही त्यांच्या काळात खेळाडू होते हे माझे भाग्य आहे. यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये करिअर करू शकले.”
दुखापत झाली पण हार मानली नाही
सुरुवातीला सोजन स्प्रिंट स्पर्धांमध्ये भाग घेत असे. यामुळे त्याला अनेकदा तिला दुखापतींना सामोरे जावे लागले. तिच्या पायाला तीन वेळा दुखापत झाली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सोजन पहिल्यांदा जखमी झाली होती. त्यानंतर तिच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली. यातून सावरल्यानंतर तिला २०२१ मध्ये टाचेला दुखापत झाली. इतकंच नाही तर स्प्रिंट स्पर्धेत भाग घेतल्याने तिला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. मात्र, एवढे होऊनही सोजनने कधीही हार मानली नाही आणि मेहनत करत राहिली. आता तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे.
तिने १०० मीटर आणि २०० मीटर स्प्रिंटमध्येही भाग घेतला
सोजनने २०२२ मध्ये स्प्रिंटमधून लांब उडी खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की, “१०० मीटर आणि २०० मीटर स्प्रिंटसाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण आणि पोषक आहार आवश्यक आहे.” ती पुढे म्हणते, “अंडर-२० मध्ये माझ्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर करून मी स्प्रिंटमध्ये स्पर्धा करू शकले, पण भारतातील पहिल्या पाचमध्ये पोहोचण्यासाठी मला चांगले पोषण आणि प्रशिक्षण मिळाले नाही. याशिवाय माझ्या अंगठ्यालाही अनेकदा दुखापत झाली. त्यामुळे माझे प्रशिक्षक आणि पालकांशी चर्चा करून मी ठरवले की २०२२ पासून मी फक्त लांब उडीतच स्पर्धा करेन. यामुळे मला माझे लक्ष आणि प्रशिक्षण एकाच उद्देशावर केंद्रित करण्यात मदत झाली आहे. पूर्वी मी खूप तणावात होते कारण, स्प्रिंटमधील माझे निकाल खूप अनियमित होते. आता सुदैवाने जेव्हापासून लांब उडीचे निकाल चांगले आणि सकारात्मक आले आहेत आणि तेव्हापासून मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.”
सात मीटरचा टप्पा गाठण्याचे स्वप्न आहे
लांब उडीत सात मीटरच्या जादुई आकड्याला स्पर्श करण्याचे सोजनचे स्वप्न आहे. त्याच्यासाठी, तिचे पालक आणि प्रशिक्षक कन्नन मॅश हे खूप मेहनत घेत आहेत कारण तिच्यामते, तिच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली लोक आहेत. ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार आणि जमैकाचा माजी महान ॲथलीट उसेन बोल्ट हे सोजनचे आवडते खेळाडू आहेत. २०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय संमेलनात सोजनला मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून गौरविण्यात आले. ती सध्या त्रिशूर येथील सेंट थॉमस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. यावर्षी बँकॉक येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ती ६.४१ मीटरच्या लांब उडीत चौथ्या स्थानावर राहिली.