आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २८ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय बॅडमिंटन चमू सज्ज झाला आहे. गोपीचंद यांना नाकारत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सायनाला विजयपथावर परतण्याची ही चांगली संधी आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या पी.व्ही. सिंधूला हाच फॉर्म कायम राखण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. दुखापतीमुळे ज्वाला गट्टाने माघार घेतल्यामुळे दुहेरीची बाजू कमकुवत झाली आहे. अश्विनी पोनप्पाने साथीदार म्हणून सिंधूला प्राधान्य दिले आहे. एकेरी व दुहेरी दोन्ही प्रकारांत खेळायचे ठरवल्यास सिंधूवरील जबाबदारीत भर पडणार आहे.  राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर जागतिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत गारद झालेल्या पी. कश्यपला कामगिरीत सातत्य आणावे लागेल. पुरुष संघाची सलामीची लढत यजमान दक्षिण कोरियाशी होणार आहे. कश्यपला किदम्बी श्रीकांत, आरएमव्ही गुरुसाईदत्तची साथ मिळणे आवश्यक आहे. दुहेरीत अक्षय देवलकर व प्रणव चोप्रा जोडीकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

Story img Loader