हांगझो :करोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धाना आज, शनिवारपासून अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. अर्थात, काही क्रीडा प्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाल्यामुळे उद्घाटन सोहळा हेच आजच्या दिवसाचे खास आकर्षण असेल. भारताचे यंदाच्या स्पर्धेत आशियाई स्तरावरील आपली ताकद दाखवून देण्याचे लक्ष्य असेल.
‘इस बार सौ पार’ अशा घोषवाक्यासह भारताचे पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. यंदा भारताने आजवरचे आपले सर्वात मोठे ६५५ खेळाडूंचे पथक आशियाई स्पर्धेसाठी पाठवले आहे. इंडोनेशियात २०१८ मध्ये झालेल्या गेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ७० (१६ सुवर्ण, २३ रौप्य, ३१ कांस्य) पदकांची कमाई केली होती. या वेळी हा आकडा शंभरी गाठणार असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. स्पर्धेत ४० क्रीडा प्रकारांचा समावेश असला तरी भारत ३९ क्रीडा प्रकारांत सहभाग घेणार आहे.
हेही वाचा >>> अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनचा मज्जाव!
कोरियात १९८६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला होता. मात्र, त्यानंतर भारत पहिल्या पाचात येऊ शकलेला नाही. हे चित्र या वेळी बदलण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेहमीच अॅथलेटिक्स आणि कुस्तीने भारताची पदके वाढवली आहेत. या वेळीही अॅथलेटिक्समध्ये निश्चित आशा आहेत, पण कुस्तीमधील पदकांबाबत कमालीची धाकधूक आहे. जागतिक स्पर्धेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर मल्ल सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यावर वेगळेच दडपण असेल.
भारताची ‘या’ खेळाडूंवर भिस्त
* नीरज चोप्रा (भालाफेक), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पी. व्ही. सिंधू (बॅडिमटन), बजरंग पुनिया (कुस्ती), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) या ऑलिम्पिक पदक विजेत्यांकडून अपेक्षा.
* अविनाश साबळे (३ हजार मीटर स्टीपलचेस), एच. एस. प्रणॉय (बॅडिमटन), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी (तिरंदाजी), निखत झरीन (बॉक्सिंग), पुरुष व महिला क्रिकेट संघ, पुरुष व महिला कबड्डी संघ, पुरुष व महिला हॉकी संघ हे यंदा सुवर्णपदकाच्या शर्यतीत. टेनिसमध्ये अनुभवी रोहन बोपण्णामुळे पदकाची आशा. नेमबाजांकडेही लक्ष.
भव्य उद्घाटन सोहळा
आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज चीनचे अध्यक्ष शी जिनिपग यांच्या हस्ते करण्यात येणार असून, उद्घाटन सोहळाही अन्य स्पर्धाच्या तुलनेत भव्य असेल असे मानले जात आहे. चीनने स्पर्धेसाठी आतापर्यंत १.४ अब्ज डॉलर इतका खर्च केला आहे.
* वेळ : सायं. ५.३० वाजता
* थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३(संबंधित एचडी वाहिन्यांवर)
सर्वात मोठी स्पर्धा
या वेळच्या आशियाई स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या आकडय़ाने ऑलिम्पिकलाही मागे टाकले आहे. आशियाई स्पर्धेत १२ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. टोक्यो येथे झालेल्या गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ११ हजार खेळाडूंचा सहभाग होता. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी हा आकडा त्याहून कमी म्हणजे १०,५०० इतकाच राहणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीत आयोजन
एक वर्षांनंतर चीनने आशियाई स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले असले, तरी संघटन पातळीवर स्पर्धेसाठी फारसी अनुकूल परिस्थिती नाही. आशियाई ऑलिम्पिक समितीची निवडणूक कुवैतच्या शेख तलाल फहाद अहमद अल सबा यांनी जिंकली होती. त्यांच्या मोठय़ा भावाने शेख अहमदने ३० वर्षे या समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. मात्र, निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक पातळीवर चौकटी बाहेर जाऊन प्रयत्न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आशियाई ऑलिम्पिक समितीस निलंबित केले. अशा वेळी भारताच्या रणधीर सिंग यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देऊन ही स्पर्धा पार पाडली जात आहे. रणधीर सिंग यांनी यापूर्वी या समितीचे सरचिटणीसपद सांभाळले आहे.