संदीप कदम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबाद : आता आपले पूर्ण लक्ष प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटण संघासाठी चमकदार कामगिरी करण्याकडे असले, तरी भविष्यात महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्याचे आपले ध्येय असल्याचे अस्लम इनामदार म्हणाला. शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये अस्लम पुणेरी पलटणचे कर्णधारपद भूषवणार आहे.‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात माझा समावेश होता. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही आम्ही सुवर्ण कामगिरी केली. आता महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून द्यायचे आहे. तसेच शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीत पुणेरी पलटणला जेतेपद मिळवून देण्यासही मी प्रयत्नशील आहे,’’ असे अस्लमने सांगितले.

या हंगामात पुणेरी पलटण संघाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल अस्लम म्हणाला, ‘‘गेल्या पर्वात आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या हंगामात एक पाऊल पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. गेल्या हंगामात मी काही सामन्यांत संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, या वेळी संघ व्यवस्थापनाने माझ्या विश्वास दाखवला आहे आणि कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आमचा संघ बचाव व आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर मजबूत आहे. त्यामुळे या हंगामात छाप पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’’

हेही वाचा >>>IND vs AUS 4th T20: रिंकू-अक्षरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय, ३-१ ने जिंकली मालिका

तसेच महाराष्ट्राचे खेळाडू आता प्रो कबड्डीमध्ये फारसे दिसत नसल्याची खंतही या वेळी अस्लमने व्यक्त केली. ‘‘कबड्डी हा खेळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. यापूर्वी मी महाराष्ट्राचे अनेक खेळाडू लीगमध्ये खेळताना पाहिले आहे. मात्र, सध्या त्यांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंनी एक-दोन हंगामाचा विचार न करता दीर्घकाळ खेळण्यावर भर दिला पाहिजे. इतर खेळांप्रमाणे या खेळातही कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळतो. लीगमध्ये हरियाणाच्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ते तंदुरुस्ती चांगली ठेवतात. आपल्या खेळाडूंनीही तंदुरुस्तीमध्ये सातत्य राखल्यास महाराष्ट्राचे आणखी खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसतील,’’ असे अस्लम म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aslam inamdar statement that his goal is to bring maharashtra the national title in the future amy