उपनगरचे प्रताप शिंदे संयुक्त कार्यवाह
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २६ जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा फार्स मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडला. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पदांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दहा दिवस आधीच निवडणुकीचा निकाल लागला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांची सरकार्यवाह पदावर आणि उपनगरच्या प्रताप शिंदे यांची संयुक्त कार्यवाह पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सरकार्यवाह पदासाठी ठाण्याचे मनोज पाटील आणि परभणीचे मंगल पांडे यांनी माघार घेतली. याचप्रमाणे शशिकांत ठाकूर (ठाणे) आणि अजगर अली पटेल (नांदेड) यांनी संयुक्त कार्यवाह पदाच्या लढतीतून अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणुक विनासायास पार पडली. संयुक्त सचिव पदाचा राजीनामा देणारे मंगल पांडे यांच्याकडे या साऱ्या प्रक्रियेत आता कोणतेही पद उरलेले नाही.
आता २६ तारखेला फक्त किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शिवाजी पार्क येथील कार्यालयात होणार आहे.