गुरुवारी दुपारी अडीच वाजता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांना दूरध्वनी करून स्वतःच्या २०० व्या कसोटीनंतर निवृत्ती घेण्याची माहिती त्यांना दिली. एकदम अचानक सचिनने दूरध्वनी करून आपली भूमिका व्यक्त केल्यानंतर काहीसा धक्का बसलेल्या पटेल यांनी वारंवार सचिनला ‘तू खरंच निवृत्तीबद्दल म्हणतोयस?’ असा प्रश्न विचारला. सचिनने आपली भूमिका स्पष्ट केल्यावर वेगाने घडामोडी घडल्या आणि बीसीसीआयकडून सचिनच्या निवृत्तीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. स्वतः पटेल यांनीच ही माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
मला माझ्या निवृत्तीबद्दल घोषणा करायचीये, असे सचिनने फोनवर आपल्याला सांगितले. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशी सचिन आधीच बोलला होता. बीसीसीआयने यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती द्यावी, असे सचिन आपल्याशी बोलल्याचे पटेल यांनी सांगितले.
त्यानंतर सचिनने खालील निवेदन प्रसिद्ध करायला सांगितले.
‘‘माझे संपूर्ण आयुष्य मी भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न जोपासले. हे स्वप्न मी गेली २४ वर्षे प्रत्येक दिवस जगत आहे. मी ११ वर्षांचा होतो तेव्हापासून माझ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. त्यामुळे क्रिकेट न खेळता जीवन जगणे याचा विचार करणेही मला कठीण जात आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि जगभरात खेळणे, हा मी माझा मोठा सन्मान समजतो. मी माझ्या कारकीर्दीतील २००वा कसोटी सामना मायदेशात खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचे ठरवले आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या माझ्यावरील सर्वतोपरी प्रेमाबद्दल आणि मला अंत:करणापासून जोवर खेळावेसे वाटेल तोपर्यंत खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल बीसीसीआयचा मी अत्यंत ऋणी आहे. माझ्या कुटुंबीयांचा त्यांच्या संयम आणि समजूतदारपणाबद्दल आभारी आहे. या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी माझे चाहते आणि हितचिंतक यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला मैदानावर जाऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळाले.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा