‘पाकिस्तानच्या सामन्यानंतर आठवडाभराची विश्रांती आहे ते बरं आहे. ३६व्या वर्षी मला या विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे’, असं विराट कोहलीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं. ५१व्या वनडे शतकासह कोहलीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. सामना संपल्यानंतर कोहलीने शतकाचं मोल सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहली म्हणाला, ‘मी आज ज्या पद्धतीने बॅटिंग करू शकलो ते अतिशय समाधानकारक आहे. सेमी फायनल प्रवेशाच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवणं अत्यावश्यक होतं. रोहित बाद झाल्यानंतर माझ्यावर जबाबदारी होती. मी त्याला न्याय देऊ शकलो याचं समाधान आहे. मधल्या षटकांमध्ये सामन्यावर पकड मिळवणं गरजेचं होतं. फिरकीपटूंविरुद्ध धोका न पत्करता खेळलो. वेगवान गोलंदाजीवर आक्रमण केलं. या पद्धतीने मी आज खेळलो. वनडे क्रिकेटमध्ये मी याच प्रारुपाने खेळतो’.

तो पुढे म्हणाला, ‘इनिंग्ज कशी बांधावी याचे माझे आराखडे ठरलेले आहेत. बाहेर कोण काय म्हणतंय ते बाजूला ठेऊन खेळणं आवश्यक आहे. उष्ण आणि दमट वातावरणात ऊर्जा कायम ठेऊन खेळणं अवघड आहे. त्याचवेळी विचार नियंत्रणात ठेवणंही कळीचं आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ शकतो तसंच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचं दडपणही घेऊ शकतो. याऐवजी मी १०० टक्के योगदान कसं देऊ शकेन याचा मी विचार करतो. ते मला आवडतं. तुम्ही मान मोडून मेहनत करता तेव्हा देव तुमची साथ देतो. तुम्हाला काय करायचं आहे ते ठाऊक असणं आवश्यक आहे’.

विराटला शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची तोलामोलाची साथ मिळाली. त्यांच्या योगदानाविषयी बोलताना तो म्हणाला, ‘शुबमन अफलातून फॉर्ममध्ये आहे म्हणूनच तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. श्रेयस २०२३ वर्ल्डकपपासून खोऱ्याने धावा करतो आहे. त्या दोघांनी सुरेख खेळी साकारल्यामुळेच मला मदत झाली. सांघिक कामगिरीमुळेच जिंकू शकलो. या सामन्यानंतर आठवडाभर विश्रांती मिळणार आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ३६व्या वर्षी मला ही विश्रांची मोलाची आहे कदाचित २४वर्षीय तरुणांना त्याची एवढी गरज नसेस पण मला आहे. कारण या वयात अशा वातावरणात खेळण्यासाठी उतरणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे’.