‘‘चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून सलग आठ वर्षे खेळलो. त्यामुळे चेन्नईशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत. अर्थात आगामी दोन वर्षे रायझिंग पुणे सुपरजाएंट्सला सर्वोच्च यश मिळवून देणे तसेच त्याआधी भारताला ट्वेन्टी२० चे विश्वविजेतेपद मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील,’’ असे रायझिंग पुणे संघाचा व भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सांगितले.
रायझिंग पुणे सुपरजाएंट्सच्या जर्सीचे अनावरण धोनी व या फ्रँचाईजीचे मालक संजीव गोएंका यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीने सांगितले की, ‘‘आयपीएलच्या सुरुवातीपासून मी चेन्नई संघाकडून खेळलो आहे. या संघाकडून खेळताना या संघातील खेळाडूंबरोबर माझे खूपच भावनिक नाते जुळले आहे. तसेच त्यांच्यामुळे माझी लोकप्रियता वाढली. मॅचफिक्सिंगच्या आरोपांबाबतचा इतिहास बाजूला ठेवून मी केवळ या संघाने मला काय चांगले दिले याचाच मी विचार करीत असतो. आता दोन वर्षे पुण्याकडून खेळताना मी सकारात्मक वृत्तीने खेळणार आहे. आमचा संघ अतिशय समतोल आहे. संघातील सर्वच खेळाडू गुणवान आहेत. त्यांच्याकडून क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करून घेण्यावर माझा भर राहील.’’
पुणे संघाच्या प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत धोनी म्हणाला, ‘‘फ्लेमिंग यांनी चेन्नई संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझा सुसंवाद आहे. आम्ही दोघे संघातील अन्य खेळाडूंबरोबर उत्तम समन्वय ठेवीत सर्वोच्च यश मिळविण्याचा प्रयत्न करू.’’
अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करायला हवे
आयपीएलमधील नकारात्मक गोष्टींचा मी विचार करीत नाही. या स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवीत मी खेळत असतो. अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करायला हवे. ही स्पर्धा युवा पिढीसाठी उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेद्वारे पैसा मिळत असतो, अशी नेहमीच टीका होत असते, मात्र या स्पर्धेत खेळणाऱ्यांची कारकीर्द जेमतेम २ ते ७ वर्षांचीच असते, ही गोष्ट लक्षात घेतली तर खेळाडूंना या स्पर्धेद्वारे चांगला पैसा मिळणे ही काही वाईट गोष्ट नाही. मात्र चांगल्या मार्गानेच पैसा मिळविण्यावरच खेळाडूंनी लक्ष ठेवावे.
‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आम्हीच सरस’
श्रीलंकेवर विजय मिळवत भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. पण यामध्ये काहीच नवल नसल्याचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटते. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सरस राहिलो आहोत, असे मत धोनीने व्यक्त केले आहे.
आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल धोनीला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सरस राहिलो आहोत. विश्वचषक भारतामध्येच होणार असल्याचे वातावरण आणि खेळपट्टीचा आम्हाला चांगलाच अंदाज आहे. या विश्वचषकात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल. भारताच्या संघात अव्वल दर्जाचे फिरकीपटू असून त्याचा चांगलाच फायदा आम्हाला होईल.’’
साहाय्यक प्रशिक्षकपदी हृषीकेश कानिटकर
पुणे संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी हृषीकेश कानिटकरकडे सोपविण्यात आली आहे. कानिटकर हे पुण्याचे खेळाडू असून त्यांनी महाराष्ट्र व राजस्थानकडून रणजी तसेच अन्य स्थानिक स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वोच्च यश मिळवू – गोएंका
धोनीसारख्या कल्पक खेळाडूच्या नेतृत्वाखालील पुणे संघाची मालकी आमच्याकडे आहे. त्याच्या ज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत आयपीएलमध्ये सर्वोच्च यश मिळवू. आयपीएलमधील संघ विकत घेण्यासाठी गेली दोन वर्षे आम्ही वाट पाहात होतो, असे संजीव गोएंका यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा