रणजी करंडक  क्रिकेट स्पर्धा

पहिल्या डावात कर्नाटकच्या ४०० धावा

कर्नाटकने पहिल्या डावात उभारलेल्या ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने २ बाद ९९ धावा केल्या आहेत. त्यामुळे कर्नाटककडे ३०१ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवसअखेर नाबाद शतकी खेळी केलेल्या सिद्धार्थ कृष्णमूर्तीने दुसऱ्या दिवशी त्याच लय आणि एकाग्रतेने खेळ केला. त्याने केलेली १६२ धावांची दमदार खेळी आणि त्याला कर्णधार श्रेयस गोपालने दिलेली ४८ धावांची साथ यामुळे कर्नाटकाचा डाव तीनशेपल्याड पोहोचणे शक्य झाले. ते दोघे बाद झाल्यानंतर शेवटच्या फळीतील जगदीशा सुचित आणि अभिमन्यू मिथुन यांनी अर्धशतकी भागीदारी करीत कर्नाटकला ४०० पर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले. अखेर कर्नाटकचा डाव १२९.४ षटकांत ४०० धावांवर संपुष्टात आला. मुंबईकडून शिवम दुबेने ५३ धावांमध्ये ७ गडी बाद केले.

फलंदाजीस उतरलेल्या मुंबईला डावाच्या प्रारंभीच धक्का बसला. मिथुनने अखिल हेरवाडकरला अवघ्या ५ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अक्षय सरदेसाईला बरोबरीला घेत जय बिश्तने झुंजार अर्धशतकी खेळी करीत संघाला शतकी धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मात्र दिवसअखेर अक्षय २३ धावा काढून बाद झाला असून जय ६९ धावांवर खेळत आहे. खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या २ बाद ९९ धावा झाल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक (पहिला डाव ) : १२९.४ षटकांत सर्व बाद ४०० (सिद्धार्थ कृष्णमूर्ती १६२, श्रेयस गोपाल ४८, शिवम दुबे ७/५३)

मुंबई (पहिला डाव) : ३६.५ षटकांत २ बाद ९९ (जय गोकुल बिश्त खेळत आहे ६९; अभिमन्यू मिथुन २२/१)