अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शनिवारी जपानच्या केई निशीकोरी आणि क्रोएशियाच्या मरिन चिलीच यांनी धक्कादायक विजयांची नोंद केली. केई निशीकोरी याने उपांत्य फेरीत नोवाक जोकोव्हिच, तर मरिन चिलीचने रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
निशीकोरी आणि चिलीच हे दोघेही प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदविणाऱ्या निशीकोरीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचला ६-४, १-६, ७-६(७-४), ६-३ असे पराभूत केले. स्पर्धेच्या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमान असतानाही निशीकोरीने उत्तम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत नोवाक जोकोविचचे आव्हान मोडीत काढले. या विजयामुळे ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीच पोहचणारा निशीकोरी हा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील उपांत्य फेरीतील विजयाबद्दल ट्विटरवरून निशीकोरीचे अभिनंदन केले.
Good news from US Open continued with Kei Nishikori’s exemplary win! My best wishes to this young sportsman for the Final.
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2014