भारताचा माजी कर्णधार विराट कोहली वाईट कामगिरीमुळे टिकेचा धनी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अतिशय वाईट फॉर्मशी झुंज देत आहे. जवळपास अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे आता काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्याला विविध सल्लेही दिले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये विराट कोहलीचे कट्टर चाहते मात्र, त्याच्या पाठीशी आहेत. विराट कोहलीच्या अशाच एका कट्टर चाहतीने त्याचा फॉर्म परत येण्यासाठी चक्क उपवास धरला होता.
माजी कर्णधार विराट कोहली फॉर्ममध्ये परत यावा म्हणून भारताची युवा खेळाडू पूजा बिश्नोईने रविवारी (१७ जुलै) एकदिवसाचा उपवास धरला होता. पूजाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. “विराट कोहली सरांच्या फॉर्मसाठी मी आज (रविवार) देवाचे व्रत (व्रत) ठेवले,” असे ट्वीट पूजाने केले. मात्र, तरीही कोहली अपयशी ठरला आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७ धावा करून बाद झाला.
युवा मैदानी खेळाडू पूजा बिश्नोई विराट कोहली फाउंडेशनच्या (व्हीकेएफ) मदतीने स्पर्धांसाठी तयारी करत आहे. ती एक ‘ट्रॅक अॅथलीट’ असून तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिने ‘सिक्स-पॅक अॅब्स’ कमवले होते. अशी कामगिरी करणारी ती जगातील सर्वात लहान मुलगी ठरली होती. उसेन बोल्टप्रमाणे वेगवान धावपटू बनण्याचे तिचे स्वप्न आहे. इन्स्टाग्रामवर पूजाचा निश्चय आणि मेहनतीचे व्हिडीओ बघून विराट कोहली फाऊंडेशनने तिचा प्रवास, पोषण आणि प्रशिक्षण यासह सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.