सातत्यपूर्ण आणि वर्चस्ववादी खेळासाठी प्रसिद्ध बार्सिलोनाला बरोबरीत रोखत अॅथलेटिक बिलबाओने तब्बल ३१ वर्षांनंतर सुपर चषक स्पर्धेचे जेतेपदावर नाव कोरले. बिलबाओने मंगळवारी स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पध्रेत बार्सिलोना क्लबला १-१ असे बरोबरीत रोखून ५-१ अशा सरासरीच्या जोरावर ३१ वर्षांनंतर जेतेपदाची चव चाखली. त्यांनी १९८४साली सुपर चषक स्पध्रेचे जेतेपद जिंकले होते.
पहिल्या साखळी सामन्यात बार्सिलोनाला ०-४ असे नमवत जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या बिलबाओने अप्रतिम सांघिक खेळ केला. मात्र, लिओनेल मेस्सीने ४३व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाला १-० असे आघाडीवर ठेवले. मात्र, मध्यंतरानंतर गेरार्ड पिक्यू याला लाल कार्ड दाखविण्यात आल्याने बार्सिलोनाला दहा खेळाडूंसह संघर्ष करावा लागला. याचा फायदा घेत बिलबाओ संघाकडून ७४व्या मिनिटाला अॅरित्झ आडुरीजने गोल करून सामना बरोबरीत आणला.
पहिल्या साखळी सामन्यात अॅरित्झच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बिलबाओने दणदणीत विजय साजरा केला होता. या पराभवामुळे बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एनरिक्स यांनी मंगळवारच्या सामन्यात संघात सहा बदल केले होते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ७४व्या मिनिटाला अॅरित्झच्या गोलनंतर बार्सिलोनाने आक्रमक खेळ केला, परंतु त्यांच्या आक्रमणाला थोपवण्याची रणनीती बिलबाओने आखली होती. त्यामुळे निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पहिल्या साखळी सामन्यातील विजयामुळे बिलबाओ क्लबला जेतेपद देण्यात आले. बिलबाने १९८४मध्ये शेवटचा सुपर चषक उंचावला होता. त्यानंतर त्यांना सातत्याने अपयश आले होते. मात्र, बार्सिलोनाला नमवून त्यांनी ही अपयशाची धुळ झटकली आहे. बिलबाओ क्बलने ८ वेळा ला लीगा स्पध्रेत बाजी मारली असून कोपा डेल रे चषकावर २३ वेळा त्यांनी राज्य गाजवले आहे.
या पराभवामुळे यंदाच्या हंगामात सहा जेतेपद पटकावण्याचा विक्रमाने बार्सिलोनाला हुलकावणी दिली आहे. २००९मध्ये पेप गॉर्डीओला यांच्या नेतृत्वाखाली खेळताना बार्सिलोनाने एका हंगामात सहा जेतेपद जिंकली होती.
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धा : बिलबाओची धूम
सातत्यपूर्ण आणि वर्चस्ववादी खेळासाठी प्रसिद्ध बार्सिलोनाला बरोबरीत रोखत अॅथलेटिक बिलबाओने तब्बल ३१ वर्षांनंतर सुपर चषक स्पर्धेचे जेतेपदावर नाव कोरले.
First published on: 19-08-2015 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athletic bilbao win spanish super cup after 5 1aggregate win over barcelona