रशियन खेळाडूंनी सरकारच्या मान्यतेने उत्तेजक सेवन केल्याचा अहवाल जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) दिला आहे. त्याचबरोबर खेळाडूंवर आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत बंदी घालावी, अशी शिफारसही या समितीने केली आहे. वाडाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती मारिया सॅव्हिनोवा (८०० मीटर धावणे) हिला चौकशीकरिता बोलावले असून तिच्यावर तहहयात बंदी घालण्याचे ठरविले आहे.
रशियन खेळाडूंची मॉस्को येथील प्रयोगशाळेत उत्तेजक चाचणी करण्यात येते. मात्र या चाचणीला अधिकृत मान्यता नाही. ‘वाडा’चे माजी प्रमुख रिचर्ड पौंड यांनी सांगितले की, ‘‘रशियामध्ये उत्तेजकाबाबत भयानक स्थिती तेथे आहे. जर रशियन संघटकांकडून याबाबत योग्य उत्तर आले नाही तर त्यांच्या धावपटूंवर कडक कारवाई करण्यात येईल. या धावपटूंना पाठीशी घालण्याचे काम तेथील शासन करीत आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे.’’

नियमांचे पालन केल्याचा रशियाचा खुलासा
मॉस्को : ‘वाडा’च्या नियमावलीचे आम्ही सतत पालन केले आहे, असा खुलासा रशियन क्रीडा मंत्रालयाने केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘‘रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत. उत्तेजक चाचण्यांचे नमुने वाडा संस्थेनेच नष्ट केले आहेत. आमच्या देशात आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धाचे वेळी वाडा संस्था व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे निरीक्षक उपस्थित असतात. उत्तेजक प्रतिबंधक योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होते की नाही याबाबतही हे निरीक्षक काळजी घेत असतात.