‘फिफा’पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रही उत्तेजक व संघटना स्तरावर झालेल्या भ्रष्टाचारामुळे चर्चेत आले आहे.
उत्तेजक सेवन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे आगामी रिओ ऑलिम्पिकपूर्वी खेळाडूंना त्यापासून रोखणे हे मोठे आव्हान संघटनांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळेच जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने आतापर्यंत केलेल्या उत्तेजक चाचणीचा अहवाल लवकरच जाहीर करण्याचे ठरविले आहे. हा अहवाल तयार करणारे रिचर्ड मॅक्लारेन यांनी सांगितले की, ‘‘या अहवालामुळे क्रीडा क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. दुर्दैवाने उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी असलेल्या खेळाडूंना पाठीशी घालण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर लाच घेतली जाते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.’’
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने २००१ ते २०१२ या कालावधीत पाच हजार खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली. या चाचणीच्याच अहवालावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. दोषी खेळाडूंमध्ये रशियाच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंची प्रकरणे लपविण्यासाठी महासंघाचे यापूर्वीचे अध्यक्ष लॅमिनी दियाक यांनी मोठय़ा प्रमाणात लाच घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रशियाचे क्रीडामंत्री व्हिताली मुटको यांनी दोषी खेळाडूंवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ते म्हणाले, आम्ही जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीचा अहवाल सविस्तर पाहणार आहोत. उत्तेजकप्रकरणी दोषी आढळणारा खेळाडू कितीही मोठा असला, तरी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या नियमावलींच्या आधारेच कठोर कारवाई होईल.
दियाक यांची नीतिमूल्ये समितीपुढे १६ ते १८ डिसेंबरदरम्यान चौकशी केली जाणार आहे.

Story img Loader