कबड्डी हा खेळ भारताच्या संस्कृतीशी निगडित असल्यामुळे प्रो-कबड्डी लीग लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाले आहे. या टीव्ही प्रेक्षकांच्या लोकप्रियतेने फिफा विश्वचषकालाही मागे टाकले आहे. भारताबाहेरील राष्ट्रांमधूनसुद्धा प्रो-कबड्डीची प्रशंसा होत आहे. काही आफ्रिकेतील देशांमधून कबड्डी खेळाची आता विचारणा केली जाऊ लागली आहे, हे मी प्रो-कबड्डीचे यश मानतो. आफ्रिकेतील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती खेळाला पूरक असल्यामुळे कबड्डी त्या खंडात उत्तमरीत्या रुजू शकेल, असे मत भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ई. प्रसाद राव यांनी व्यक्त केली. प्रो-कबड्डी अंतिम टप्प्यात वाटचाल करीत असताना त्यांच्याशी केलेली खास बातचीत-
प्रो-कबड्डीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय सांगाल?
महिन्याभरापूर्वी प्रो-कबड्डीच्या अध्यायाला प्रारंभ झाला. स्पर्धा जशी पुढे जात आहे, तशी त्याची लोकप्रियता अधिक वाढते आहे. विशाखापट्टणम्मध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद सर्वात चांगला होता. अमेरिकेत बास्केटबॉल, जपानमध्ये सुमो हे खेळ जसे संस्कृतीप्रमाणे रुजले आहेत तशाच प्रकारे कबड्डीचा इतिहास भारताच्या संस्कृतीशी नाते सांगणारा असल्यामुळे तो आता खऱ्या अर्थाने रुजू लागला आहे. बहुतांशी भागात ‘लवकर भोजन करा, कबड्डीचे सामने पाहायचे आहेत’ ही वाक्ये आता कानावर पडू लागली आहेत.
फक्त कबड्डीसाठी स्टेडियम भारतात अस्तित्वात नसल्यामुळे प्रो-कबड्डीचे स्वप्न साकारताना उपलब्ध स्टेडियममध्ये कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागली?
जपानमधील टोकियो शहरातील थायसो विद्यापीठात फक्त कबड्डीसाठीचे स्टेडियम आहे, परंतु आपल्या भारतात मात्र खास कबड्डीचे स्टेडियम नाही, ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यासाठी जसे स्टेडियम, अन्य सुविधा उपलब्ध होतात, तशा आम्हाला मिळणार नाहीत, याची कल्पना होती. परंतु आठही शहरांमध्ये आम्ही प्रो-कबड्डीच्या सादरीकरणासाठीचे सारे काही तयार केले. जयपूर पिंक पँथर्सचे मालक आणि अभिनेते अभिषेक बच्चन जयपूरमध्ये कबड्डीसाठी खास स्टेडियम बांधण्याच्या विचारात आहेत. याचप्रमाणे कर्नाटकमध्येही कबड्डीचे स्टेडियम होण्याच्या हालचाली होत आहेत.
प्रो-कबड्डीमधील ‘थर्ड रेड’, ‘सुपर कॅच’ यांसारख्या काही नव्या नियमांमुळे खेळ अधिक चुरशीचा होतो आहे. हे नियम कबड्डीच्या अन्य स्पर्धामध्येही वापरले जाणार काय?
प्रो-कबड्डीचे सामने पाहण्यासाठी विविध देशांचे कबड्डी प्रशासक भारतात भेटी देत आहेत. प्रायोगिक तत्त्वावरील या नव्या नियमांचे ते कौतुक करीत आहेत. पुढील महिन्यात आशियाई क्रीडा स्पध्रेदरम्यान आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघाची बैठक होईल. त्या वेळी हे नियम लागू करण्याचा प्रस्ताव येऊ शकेल.
भारताचा भरवशाचा खेळाडू राकेश कुमार दुखापतीमुळे दोन सामन्यांत खेळू शकला नाही. या लीगमधील दुखापतीमुळे आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला चिंतेची परिस्थिती निर्माण होऊ शकेल का?
कबड्डीपटूच्या आयुष्यात दुखापत ही हातात हात घालूनच वावरत असते. मागील आशियाई क्रीडा स्पध्रेच्या अंतिम सामन्यात राकेशला पहिल्याच चढाईच्या वेळी दुखापत झाली होती. परंतु तरीही आम्ही इराणला सहज हरवून विजेतेपद पटकावले होते. प्रो-कबड्डीमध्ये प्रत्येक संघाला किमान १४ सामने खेळायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत मिळणारा हा सरावच खरा भारताच्या पथ्यावर पडेल असे मला वाटते. या लीगमुळे जशी भारताची कामगिरी सुधारेल, तशीच हरयाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रासारख्या संघांची कामगिरीसुद्धा राष्ट्रीय स्पर्धेत सुधारेल. महाराष्ट्राचे बाराहून अधिक ख्ेाळाडू लीगमध्ये खेळत आहेत. त्यामुळे हेच ख्ेाळाडू आगामी राष्ट्रीय स्पध्रेत आपली कामगिरी उंचावतील, यावर माझा विश्वास आहे.
 सांख्यिकी आणि गुणपत्रिका याबाबतीत भारतीय कबड्डीमध्ये फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, परंतु प्रो-कबड्डीमध्ये या तांत्रिक अंगांचा योग्य रीतीने विचार केलेला दिसत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
भारतीय कबड्डीने या गोष्टींकडे आजपर्यंत गांभीर्याने पाहिले नाही, हे मी सर्वप्रथम मान्य करतो. खेळाडू आणि चढाईपटूंच्या कामगिरीचे पृथक्करण प्रो-कबड्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे वेळेसोबत सामन्यातील प्रत्येक घडामोडी नोंदवू शकणारे सॉफ्टवेअर मशाल स्पोर्ट्सने तयार केले आहे. त्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे आम्ही याबाबतचा एक विभाग स्थापन करावा, अशा सूचना आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी मला दिल्या आहेत. आम्ही मशाल स्पोर्ट्सला त्यांचे सॉफ्टवेअर देण्याची आणि आमच्या तांत्रिक सदस्यांनी त्यांचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा