भारताच्या सोमदेव देववर्मन, विजयसुंदर प्रशांत व सनमसिंग यांनी केपीआयटी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र त्यांचा सहकारी साकेत मायनेनी या पाचव्या मानांकित खेळाडूला बेलारुसच्या इलिया इव्हाश्का याने पराभवाचा धक्का दिला.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत इलिया याने साकेत याच्यावर ५-७, ६-४, ६-२ अशी मात केली. दोन तास चाललेल्या या लढतीत साकेत याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत पहिला सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्येही त्याने काही वेळ खेळावर नियंत्रण मिळविले होते. तथापि, इलिया याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा कल्पक खेळ करीत त्याची सव्‍‌र्हिस छेदली. सव्‍‌र्हिसब्रेकचा फायदा घेत त्याने हा सेट घेत सामन्यात उत्कंठा निर्माण केली. तिसऱ्या सेटमध्ये इलियाच्या वेगवान खेळापुढे साकेतची दमछाक झाली. त्यामुळे इलिया याला हा सेट व सामना जिंकण्यात अडचण आली नाही.
विजयसुंदरला वाढदिवशी
अनपेक्षित विजयाची भेट!
विजयसुंदर याने आपल्यापेक्षा जवळजवळ शंभर मानांकनाने वरचढ असलेल्या ऑर्थर डीग्रिफ याच्यावर अनपेक्षित विजय मिळवीत आपला २९वा वाढदिवस झोकात साजरा केला. त्याने हा सामना ६-४, ६-४ असा जिंकताना बेसलाइन व्हॉलीजचा उपयोग केला तसेच त्याने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. सनमसिंग याला इटलीच्या अलसांद्रो बेगो याच्यावर ६-४, ६-१ अशी मात करताना फारशी अडचण आली नाही. सोमदेव याला मात्र फ्रान्सच्या मॅक्झिम जेनिव्हर याच्याविरुद्ध संघर्षपूर्ण विजयावर समाधान मानावे लागले. त्याने पावणेदोन तास चाललेल्या लढतीनंतर हा सामना ६-४, ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ३-५ अशा पिछाडीवरून सोमदेव याने फोरहँडचे ताकदवान फटके व नेटजवळून प्लेसिंग असा चतुरस्र खेळ करीत सलग चार गेम्स घेतल्या आणि सामना जिंकला.
द्वितीय मानांकित एवगेनी दोनस्कोय याने अमेरिकन खेळाडू डॅनियल निग्वेन याचा ७-६ (७-२), ६-४ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित आंद्रियन मॅसेरिआस याने ऑस्ट्रियाच्या मॅक्झिम न्यूख्रिस्ट याच्यावर ६-४, ६-३ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. विशेष प्रवेशिकेद्वारे मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचा फायदा आर्यन गोवेस याला घेता आला नाही. त्याने बेल्जियमच्या जेरमान गिगोनोन याला चांगली लढत दिली. मात्र हा सामना जेरमान याने ६-७ (१-७), ६-२, ६-३ असा जिंकला.
दुहेरीतील अव्वल दर्जाचा खेळाडू पुरव राजा याने रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर कुद्रियोत्सेव याच्या साथीत जॉन फ्रुटेरो (अमेरिका) व विजयसुंदर प्रशांत यांचा ६-३, ६-४ असा पराभव केला. साकेत व सनम यांनी तेमूर इस्मालोव (उजबेकिस्तान) व अर्पित शर्मा (भारत) यांचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडविला.

Story img Loader