देशी-विदेशी दोघीही सूनबाई जोडीनं पसंत केल्या गेल्या. त्यांच्यासाठी खास पैठण्या निवडल्या गेल्या. छानशा नथीही नक्की केल्या गेल्या. खानदानातील वडीलधाऱ्यांच्या आगळ्या-वेगळ्या (१२-१२-१२) वाढदिवसाचा शुभ मुहूर्त साखरपुडय़ासाठी निश्चित केला गेला. सारे गावकरी कामास लागले. तालासुरात आमंत्रणं देऊ लागले. ‘सखूबाई, साळूबाई! साखरपुडय़ाला चला तुम्ही साखरपुडय़ाला चला!’
कन्याकुमारीपासून जम्मू-काश्मीपर्यंत, अन् मंगळुरूपासून मणीपूपर्यंतच्या साऱ्या देशातून जवळपास एक हजार निमंत्रितांनी या समारंभाचं आमंत्रण सहर्ष स्वीकारलं. गावातील चांगल्या-चांगल्या हॉटेलांत व विश्रामगृहांत त्यांची व्यवस्था केली गेली. त्यांची ने-आण, ऊठबस, परिसरातील पर्यटन यांसाठी गाडय़ांची व्यवस्था केली गेली. सकाळ-संध्याकाळ सुमारे सव्वा हजार निमंत्रितांच्या पंगती शाकाहारी-मांसाहारी-मिठाई यांच्या भोजनाचा व नाश्त्याचा आस्वाद आठवडाभर घेत राहिल्या. त्यांच्यासाठी विशाल गॅलरी उभारण्यावर अर्धा कोटी रुपये खर्च होत असला, तरी तो क्षुल्लक मानला गेला. खानदानात नवीन देशी-परदेशी सूनबाई जोडीनं येत होत्या. तो दिन सोनियाचा, त्यात कोटी-दोन कोटींच्या हिशेबांचा काथ्याकूट कसला करायचा, हीच भावना!
कानोकानी कुजबुज
वारे वाहात होते उत्साहाचे, महोत्सवाचे व जल्लोषाचे. पण दुसरीकडे कानोकानी कुजबुज पसरत होती. चौकस मंडळी चर्चा सुरू करत होती, सूनबाईंच्या कुंडलीची. त्या मंगलीक तर नाहीत ना? त्यांना मंगळ नाही ना? याची छाननी सुरू झाली. अधिकृत आदेश दिले गेले की, आता सखोल व तपशीलवार चौकशी व्हायलाच हवी. काही बुजुर्गाना बनवलं गेलं. स्वयंसेवक आणि निवडक निमंत्रितांचे अभिप्राय गोळा करण्यास चालना दिली गेली. यात सारं काही सुस्पष्ट असावं, यासाठी हे अभिप्राय लेखी स्वरूपात असावेत, अन् अभिप्रायाखाली तज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या असल्या पाहिजेत, असंही या मान्यवर स्वयंसेवकांना बजावलं गेलं. पसंत सूनबाईंच्या पत्रिकांची पाहाणी चालू झाली!
एकीकडे नेत्रदीपक रोषणाईत, निमंत्रित पाहुण्यांचे सत्कार होत होते. अहोरात्र पंगतींची मैफल रंगत होती. रोज आठ-दहा हजार गावकऱ्यांचा उत्साही सहभाग लाभत होता. पण देशी-परदेशी सूनबाईंच्या कुंडलीबाबत ज्योतिषी मंडळींचे शंका-निरसन होत नव्हतं, ते नव्हतंच. चौकशी यापूर्वी का झाली नाही? असा त्या ज्योतिषी मंडळींचा सवाल बिनतोड ठरत होता. ही चौकशी आणखी काही वर्षे, वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे, असे हे ज्योतिषी सांगू लागले होते. आणि हे ज्योतिषीबुवा कोणी साधे-सिधे नव्हते. राज्य व केंद्र सरकारकडून गौरवीत होते, राज ज्योतिषी होते! बोला आता!
हे चित्र होतं, रोज आठ-दहा- बारा हजार प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या, बारामतीतील ४६व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे. शानदार संयोजन, स्थानिक प्रेक्षकांचा दुमदुमता प्रतिसाद हा भाग विलोभनीय. स्पर्धा आपल्या राज्यात होत असताना, मानधन अन् बस-रेल्वे प्रवास खर्च आपणहून करणाऱ्या चंद्रजीत जाधव, तुषार सुर्वे, महेश मेढेकर प्रभृतींसह महाराष्ट्र राज्य खोखो संघटनेचे पदाधिकारी व उप-समिती सदस्य, मराठी पंच, कार्यकर्ते अशा सुमारे साठ जणांचा समंजसपणा, आणि त्यातून होणारी सुमारे एक लाख रुपयांची बचत, हे वर्तनही आकर्षक व अनुकरणीय.
रोख इनाम विजेत्या खो-खो संघांसह संबंधित राज्य संघटनांना देण्याचा पायंडाही स्तुत्य. त्या तीन-चार लाखांमुळे महाराष्ट्र खो-खो संघटनेची तिजोरी छत्तीस लाखांवरून चाळीस लाखांवर जाईल, पण तिचा खास फायदा होईल केरळसारख्या खो-खोतील उपेक्षित संघटनेस. त्या संस्थेच्या बचत खात्यात आज केवळ दहा हजार रुपये आहेत, असे त्यांचे पदाधिकारी जी. व्ही. पिल्ले सांगतात. पण बारामतीतील महिला उप-विजेतेपदाचे इनाम आणि केरळ राज्य स्पोर्टस् कौन्सिलतर्फे राष्ट्रीय सांघिक उपविजेतेपदाचे तीस (३०) हजार, यामुळे त्यांचा खजिना दोन लक्ष रुपयांची मजल एका फटक्यात गाठेल. केरळीय खो-खोच्या विकासास बारामतीचे म्हणजेच महाराष्ट्राचे केवढे भरघोस योगदान!
पण या आकर्षक संयोजनाची दुसरी बाजू, खो-खोतील गोंधळाची. युरोपीयन देशांच्या निष्फळ व विस्कळीत अनुनयाची. त्याबाबतच्या सर्वस्वी भ्रामक व सोयीस्कर समजुतींची, ऑलिम्पिक प्रवेशाच्या पतंगबाजीची, आणि या खटपटी-लटपटीत कबड्डीपाठोपाठ खो-खोचा आत्मा गमावण्याची!
मॅटचे अर्थकारण
खो-खो संघटकांनी पसंत केलेल्या दोन देशी-परदेशी सूनबाई, म्हणजे पुण्याच्या ‘सुमित स्पोर्ट्स अॅण्ड फिटनेस इक्विपमेंट्स’कडून मागवलेली एकेक देशी व परदेशी मॅट. एक चाळीस एमएम जाडीची (डेनसिटी), दुसरी तीस एमएम जाडीची. एक देशी, दुसरी विदेशी. एक जळगावहून आणलेली, दुसरी उस्मानाबादवरून. दोन्ही मॅट राज्य क्रीडा खात्याने ‘सुमित’कडून घेतलेल्या.
सुमित कंपनीचे सर्वेसर्वा साजिद शेख सांगतात : कबड्डीची मॅट अठरा बाय एकवीस मीटर्सची, तर खो-खो मॅट एकोणीस बाय बत्तीस मीटर्सची. कबड्डी मॅटमध्ये एक मीटर बाय एक मीटरचे तीनशे ऐंशी (३८०) तुकडे, एकमेकांत एकजीव होतील असे अडकवलेले (इंटरलॉक्ड), तर खो-खोच्या या कृत्रिम क्रीडांगणात असे सहाशे आठ (६०८) तुकडे एकमेकांत घट्ट सांधलेले. त्यात थोडीही फट न राहू देणं हेच इंटरलॉकिंगचं आवश्यक वैशिष्टय़. परदेशी बनावटीची मॅट चिनी. बीजिंगमधील थाईशॅम स्पोर्ट्सची. त्याचं इंटरलॉकिंग अधिक खात्रीलायक, अधिक सफाईदार, असे साजिदभाईंचे मत.
साजिदभाईंचा व्यवहार उत्तम चालतो. चाळीस जणांना दरमहा सात हजारांपासून मोजक्या लोकांना वीस हजार रु. पगार देणाऱ्या साजिदभाईंची वार्षिक उलाढाल सात-आठ कोटींची, हँडबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल यांचे गोलपोस्ट वा. बोर्ड बनवण्यापासून कबड्डी-खोखो यांची मॅट, टेनिसचे डेको टर्फ, जिम्नॅस्टिक्स साधने, व्यायामाची साधनेही ते बनवतात. त्यांच्या अंदाजानुसार चिनी कबड्डी मॅट साडेआठ लाखांचे, तर खोखो मॅट पंधरा लाखांचे.भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रोजेक्ट ऑफिसर महेंद्रसिंग त्यागी यांची मॅटच्या अर्थकारणाची थोडी वेगळी माहिती दिली. ते सांगतात की पटियालाची एसके स्पोर्ट्स, मेरठची नेलको, दिल्लीची शिवनदेश आदी कंपन्यांची कबड्डी मॅट साडेतीन लाखाला पडतात. खो-खो मॅट सहा-साडेसहा लाखाच्या घरात जावीत. या मॅटची जाडी तीस वा चाळीस एमएम आणि डेनसिटी साठ ते सत्तरच्या आसपास.
खो-खोचे मॅटच नाही
पण मोठय़ा विनोदाचा, क्रूर कुचेष्टेचा भाग असा की, खो-खोत वापरले जात असलेले कोणतेही देशी-विदेशी मॅट, मुळात खास खो-खोसाठी बनवलेलेच नाही!
मग खो-खोत वापरतात ते मॅट कुठले? चक्क कबड्डीचे!
आणि कबड्डीसाठी गेली दोन दशके वापरले जाणारे मॅट तरी कोणी तज्ज्ञांनी खास कबड्डीसाठी बनवलं? त्या मॅट उत्पादकांच्या डोळ्यांपुढे कोणते मॅट होते? हँडबॉलचे, टेनिसचे की आणखी कोणकोणत्या खेळांचे?
आशियाई खोखो संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस (अतिरिक्त सरचिटणीस असंही अधिकारपद असावं, हा केवढा जोक. हा, हा!), कोलकताचे दिलीप घोष सांगतात की, त्यांच्या गावी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या तथाकथीत आशियाई स्पर्धेत डेको टर्फचे सिंथेटिक मॅट वापरले गेले, तर त्यानंतर बांगलादेशमध्ये ढाका- मिरपूर येथील तथाकथित आशियाई खो-खो स्पर्धा हँडबॉलच्या सिंथेटिक मॅटवर झाली! महाराष्ट्रातील नामांकित खो-खोपटू, कोलकतातील फेडरेशन चषकाच्या मॅट स्पर्धेचा किस्सा सांगतो. बँक क्रीडामंडळातर्फे आम्ही मॅटवर शूज घालून एक डाव खेळलो. तेव्हा मणीपूरने पाहाता पाहाता आमचे बावीस गडी मारले व आमची दाणादाण उडवून दिली! मग आम्ही शूज काढून ठेवले, नेहमीसारखा अनवाणी खो-खो खेळलो व मणीपूरचे चोवीस गडी टिपले! प्युमा कंपनीच्या किटमधील ते झकास शूज मग आम्ही फक्त संचलनात वापरले!
मॅटला साजेसे शूज नाहीत, शूजना साजेसे मॅट नाही. पण ऑलिम्पिकची पतंगबाजी करणाऱ्या संघटकांना त्याची काय पर्वा, काय फिकीर?
बारामतीच्या स्पर्धेत एकसष्ट (६१) संघांतील सुमारे सव्वा सातशे खेळाडू मॅटवर उतरले. पण त्यातील दोन-तीन टक्के खेळाडूंनी तरी शूज वापरले काय, याचीही पाहणी फेडरेशनने करावी!
स्पर्धा एकदम मॅटवर घ्यायची, आणि मॅटवर खेळण्याचा अनुभव कसा, याची थोडीफार माहिती गोळा करायची, हा उलटा व्यवहार झाला. मॅटवर निदान पाच वर्षे नियमितपणे निवडक संघांत प्रायोगिक स्पर्धा घ्यावी. त्यातून काय निष्कर्ष निघतात ते बघावे. मगच राष्ट्रीय स्पर्धात, खास खो-खोसाठी बनवलेलं मॅट व खास खो-खोसाठी बनवलेले शूज यांसह सारे सामने घ्यावेत.
मुळात, कबड्डी, खो-खोच्या आंतरराष्ट्रीय प्रचार-प्रसारासाठी सिंथेटिक मॅट अत्यावश्यक आहे, हा भ्रम कबड्डी, खो-खो संघटनांनी डोक्यातून काढून टाकावा. दुर्दैवाने आता फुटबॉल सिंथेटिककडे वळू लागलाय. पण गेली सव्वाशे वर्षे हा खेळ पंच खंडांतील दोनशे देशांत लोकप्रिय झाला तो मातीत फुटबॉल खेळला जात असल्याने! सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा