विश्वचषक २०२३च्या ३९व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इब्राहिम जादरानने शानदार शतक ठोकले. विश्वचषकात अफगाणिस्तानकडून शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिले काही सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी मागील पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याच्या लढाईत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होत आहे.
इब्राहिम जादरानचे दमदार शतक
अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने १३१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वन डे कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. तसेच, इब्राहिम एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, अफगाणिस्तान संघासाठी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी समिउल्लाह शिनवारीची होती, ज्याने २०१५ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध ९६ धावांची खेळी केली होती. त्याने एक बाजूने भक्कमपणे सांभाळत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला २९२ धावांचे लक्ष्य दिले होते
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला २९२ धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या. इब्राहिम जादरानने १४३ चेंडूत १२९ धावा केल्या तर राशिद खानने १८ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांच्यात सहाव्या विकेटसाठी २८ चेंडूत ५८ धावांची नाबाद भागीदारी झाली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात ६४ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.
अफगाणिस्तानचा डाव
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज २५ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम जादरान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. रहमत ३० धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीबरोबर तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची अप्रतिम भागीदारी केली. शाहिदीने फक्त २६ धावा करू शकला. अजमतुल्ला उमरझाईही २२ धावा करून बाद झाला, त्याच्या पाठोपाठ मोहम्मद नबीही अवघ्या १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, इब्राहिमने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या. त्याला मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट घेत मदत केली.
हेही वाचा: BAN vs SL: शाकिबच्या विधानावर अँजेलो मॅथ्यूजने केली सडकून टीका; म्हणाला, “मी कधीच त्याचा आदर…”
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.