Wasim Akram on Glenn Maxwell: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक २०२३ मधील ३९वा सामना केवळ ग्लेन मॅक्सवेल नावाने ओळखला जाईल. मुंबईतील वानखेडेवर मंगळवारी ग्लेन मॅक्सवेलने खेळलेली खेळी चाहत्यांच्या स्मरणात राहील. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने एकट्याने कांगारूंना उपांत्य फेरीपर्यंत नेले, जगातील क्वचितच कोणत्याही फलंदाजाला हे जमले असेल. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने एकवेळ ९१ धावांत सात विकेट्स गमावल्या होत्या आणि अफगाणिस्तान मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते, पण मॅक्सवेलला काही वेगळेच मान्य केले.
वानखेडेवर त्याने मारलेल्या चौकार आणि षटकारांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले आणि संघाला विजय मिळवून देण्याबरोबरच त्याने आपले द्विशतकही पूर्ण केले. त्याने १२८ चेंडूंत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. ‘सुलतान ऑफ स्विंग’ अशी ओळख असणारा वसीम अक्रम देखील मॅक्सवेलचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही.
वसीम अक्रमने सर्वोत्तम वन डे फलंदाज मॅक्सवेलला घोषित केले
स्विंगचा बादशाह अशी ओळख असणारा वसीम अक्रमही मॅक्सवेलची खेळी पाहून अवाक् झाला. तो म्हणाला, “मॅक्सी हा सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे,” असे त्याने जाहीर केले. पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलत असताना वसीम म्हणाला, “अशी फलंदाजी मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. एक व्यक्ती तुम्हाला कठीण परिस्थितीतून संघाला कसे बाहेर काढू शकतो आणि सामना जिंकू शकतो हे, आम्ही पाहिले आहे. तुमच्यात तेवढी हिम्मत असली पाहिजे. त्याच्या पायात गरमीमुळे गोळे येत होते, पण तरीही त्याने खेळपट्टीवर अफगाणी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला आणि ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याला वेदना होत होत्या, पण तरीही त्याने धीर सोडला नाही. मॅक्सवेलने काय अप्रतिम इनिंग खेळून इतिहास रचला ते तुम्ही एकदा बघाच.”
वसीमने मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सचे कौतुक केले. तो म्हणाला “कर्णधार पॅट कमिन्सचेही कौतुक करावे लागेल. जेव्हा तुमच्यावर कठीण परिस्थिती असते तेव्हा पॅट कमिन्सकडे पाहून परिस्थिती कशी हाताळायची हे तुम्ही शिकू शकता. त्याने ६८ चेंडूंचा सामना केला आणि १२ धावांची नाबाद खेळी खेळली. कमिन्सची ही खेळी देखील एखाद्या ऐतिहासिक खेळीपेक्षा कमी नाही. कमिन्स खेळपट्टीवर उभा होता आणि एकेरी धाव घेत मॅक्सवेलला स्ट्राइक देत होता. पॅट कमिन्स हा कौतुकास पात्र आहे.”
पुढे अक्रम म्हणाला, “मॅक्सवेलची खेळी आश्चर्यकारक आहे. अशी खेळी खेळून त्याने हे दाखवून दिले आहे की तो सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा वन डे खेळाडू आहे. अविश्वसनीय, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय! हेच त्यांचे वर्णन असे शकते. मी २८ वर्षे क्रिकेट खेळलो आहे आणि २० वर्षांपासून क्रिकेटवर वेगवगळ्या पद्धतीने काम करत आहे. अशी अद्भुत खेळी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. हे अद्वितीय आहे आणि नेहमी लक्षात ठेवले जाईल.”