Virat Kohli on Glenn Maxwell: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला क्रिकेट विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीत पोहचवले आहे. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या ९१ धावांत ७ विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियन्सनेही आपला पराभव मान्य केला असावा पण मैदानावर उपस्थित ग्लेन मॅक्सवेलला विश्वास होता की तो येथूनही आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो आणि त्याने ते करून दाखवले. मॅक्सवेलने विक्रमी द्विशतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. आरसीबीमध्ये त्याच्याबरोबर खेळणाऱ्या विराट कोहलीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत मॅक्सवेलचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे फक्त तूच करू शकतोस – विराट कोहली

आयपीएलमध्ये आरसीबी संघात ग्लेन मॅक्सवेलबरोबर खेळणाऱ्या विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत मॅक्सवेलच्या या विस्फोटक खेळीचे कौतुक केले. मॅक्सवेलचा फोटो शेअर करताना कोहलीने लिहिले की, “हे फक्त तूच करू शकतोस. ही खेळी पाहून सगळे वेडे झाले आहेत.” कोहलीने याबरोबरच एक हार्ट इमोजी शेअर केला आहे.

अफगाणिस्तान निःसंशयपणे लढला पण सामना हरला आणि त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. कागदावर छोट्या संघाप्रमाणे भासणाऱ्या अफगाणिस्तानने पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवू दिला नाही. सामन्यात ७० टक्के वर्चस्व हे अफगाणी खेळाडूंचे होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आधी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धू-धू धुतले आणि नंतर गोलंदाजीतही कमाल केली. अफगाणिस्तान विजयाच्या अगदी जवळ आला होता, जर मॅक्सवेलने ती अप्रतिम खेळी खेळली नसती तर अफगाणिस्तानचा विजय निश्चित होता.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला २९२ धावांचे चांगले लक्ष्य दिले. इब्राहिम जादरानने १२९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर गोलंदाजीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचे ७ विकेट्स ९१ धावांत घेत त्यांना अडचणीत आणले होते. जर मॅक्सवेलचे ते चार झेल अफगाणी खेळाडूंनी सोडले नसते तर आज ते उपांत्य फेरीत कदाचित पोहचू शकले असते.

हेही वाचा: AUS vs AFG: @२०१ नाबाद! ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत विश्वचषकात केला मोठा पराक्रम, कपिल देव यांचा मोडला विक्रम

ग्लेन मॅक्सवेलने येताच धमाकेदार फलंदाजी केली, त्याच्याकडे पाहून असे वाटले नाही की ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स गमावल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी २०० धावांची गरज आहे. ग्लेन मॅक्सवेलने १२८ चेंडूत २०१ धावांची नाबाद द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs afg only you could have this virat kohli reacts to glenn maxwells brilliant innings avw