T20 World Cup AUS vs ENG : टी-२० विश्वचषकात आता रंजक परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान, अमेरिका सारखे संघ आपापल्या गटात गुणतालिकेत वर असताना मोठ्या, अनुभवी संघाचा सुपर ८ मध्ये जागा निर्माण करण्यासाठी कस लागत आहे. ऑस्ट्रेलियाने ८ जून रोजी मध्यरात्री झालेल्या सामन्यात यंदाच्या विश्वचषकातील सलग दुसरा विजय नोंदविला. बारबाडोस या कॅरेबियन बेटाची राजधानी ब्रिजटाऊन येथे केसिंग्टंन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. टी-२० विश्वचषकात १७ वर्षांनंतर इंग्लंडला नमविण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने नोंदविला. याआधी २००७ च्या पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने केपटाऊन येथे इंग्लंडला नमवले होते.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, कर्णधार मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड आणि ॲडम झाम्पा यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना आता १२ जून २०२४ रोजी नामिबियाशी होणार आहे. गट ब मध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले असून ते सर्वात वरच्या स्थानी आहेत. तर नामिबियाने दोन सामन्यापैकी एकात विजय मिळविला आहे. इंग्लंडचेही दोन सामने झाले असून त्यांना एका सामन्यात पराभव तर एक सामन्यात पावसामुळे पाणी सोडावे लागले आहे.
ॲडम झाम्पामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर
ट्रॅव्हिस हेड आणि डेविड वॉर्नरने तडाखेबाज फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजासाठी एक मजबूत अशी धावसंख्या उभी करून दिली. त्यानंतर पॅट कमिन्स आणि ॲडम झाम्पाने इंग्लंडचा डाव खिळखिळा केला. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आवतण दिले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी आलेल्या ट्रॅव्हिस हेड (१८ चेंडूत ३४ धावा) आणि डेविड वॉर्नरने (१६ चेंडूत ३९ धावा) यंदाच्या हंगामात ७४ अशी पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावसंख्या उभी केली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मिचेल मार्श ३५, मॅक्सवेल २८, मार्कस स्टॉयनिस ३०, टीम डेविड ११ आणि मॅथ्यू वेडने १७ अशी धावसंख्या रचली.
इंग्लंडची जोरदार सुरुवात पण…
२०१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार सुरुवात केली होती. कर्णधार जॉस बटलरने आपल्या तडाखेबंद शैलीत २८ चेंडूत ४२ धावा ठोकल्या. तर फिल सॉल्टने त्याला उत्तम साथ देत २३ चेंडूत ३७ धावा कमावल्या. दोघांनी मिळून ४२ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. मात्र ॲडम झाम्पाने या महत्त्वाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीचा नमुना दाखवत या दोन्ही फलंदाजांना बाद केले. या दोघांना बाद केल्यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.
T20 WC 2024: आफ्रिकेला डेव्हिड मिलरने तारलं; नेदरलॅंड्स विरूध्द निसटता विजय
मार्कस स्टॉइनिसची अष्टपैलू कामगिरी
सॉल्ट आणि बटलर यांच्याशिवाय मोईन अली २५ धावा, हॅरी ब्रूक २०, लियम लिविंगस्टन १५, विल जॅक्स १० धावाच करू शकले. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २३ धावा आणि झाम्पाने २८ धावा देऊन प्रत्येकी दोन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चमक दाखविली. त्याने आणि हेजलवूडने एक-एक बळी घेतला.
सुपर ८ चे चित्र कसे?
टी-२० विश्वचषकात यंदा अ, ब, क आणि ड या चार गटात प्रत्येकी पाच असे २० संघ खेळत आहेत. त्यापैकी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या चारही संघानी आपापल्या गटातील पहिले दोन्ही सामने जिंकून वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रत्येक गटातील संघाचे चारच सामने होणार आहेत. यामुळे या संघांनी आणखी एक-एक सामना जिंकला तरी त्यांचा सुपर ८ मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल. इतर चार संघांसाठी बाकीच्या संघात चुरस पाहायला मिळणार आहे.