IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी भारताने १३७ धावांनी जिंकली आणि ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. महत्वाचे म्हणजे भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील १५०वा विजय ठरला. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उपहाराच्या विश्रांतीनंतर सुरु झाला. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने आज २ गडी बाद करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताकडून जाडेजा, बुमराहने सर्वाधिक ३-३ बळी टिपले. सामन्यात ९ बळी टिपणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले.

 

भारताने दुसरा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात ८ धावांवर बाद झालेला सलामीवीर फिंच दुसऱ्या डावात केवळ ३ धावाच करू शकला. बुमराहने पहिल्या डावातील धडाका दुसऱ्या डावातही कायम ठेवला आणि फिंचच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा हॅरिस फॉरवर्ड शॉर्ट लेगला झेलबाद झाला. त्याने १ चौकार लगावत १३ धावा केल्या. उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४४ धावांच्या मोबदल्यात २ गडी गमावले. त्यानंतर आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात ख्वाजा ३३ तर शॉन मार्श ४४ धावांवर बाद झाला. शॉन मार्शनंतर बंधू मिचेल मार्श देखील फटकेबाजीच्या नादात १० धावांवर बाद झाला. त्यामुळे चहापानपर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३८ अशी झाली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला ट्रेव्हिस हेड ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. थोड्या वेळाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन २६ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ मिचेल स्टार्क त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात एकमेव अर्धशतक लगावणाऱ्या पॅट कमिन्सने एकाकी झुंज दिली. पण तो ६३ धावांवर बाद झाला. अखेर इशांत शर्माने लॉयनला माघारी धाडत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तिसऱ्या दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद ५४ अशी झाली होती. त्या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. मात्र भारताला जास्त धावा जमवता आल्या नाहीत. आधी अग्रवाल (४२), नंतर जाडेजा (५) पाठोपाठ पंत (३३) बाद झाला. त्यामुळे भारताने दुसरा डाव ८ बाद १०६ वर घोषित केला आणि यजमान ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या डावात तब्बल ७२ धावा देत ३ बळी घेतलेल्या पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात अप्रतिम कामगिरी केली. कमिन्सचे केवळ २७ धावांत ६ बळी टिपले. ही त्याची कसोटी कारकिदीर्तील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

त्याआधी बुमराहने ३३ धावात घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला १५१ धावांत गुंडाळले होते. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २९२ धावांची आघाडी मिळाली होती.

Live Blog

07:42 (IST)30 Dec 2018
अर्धशतकवीर कमिन्स माघारी; भारत विजयापासून १ पाऊल दूर

ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात एकमेव अर्धशतक लगावणाऱ्या पॅट कमिन्सने एकाकी झुंज दिली. पण तो ६३ धावांवर बाद झाला. 

07:31 (IST)30 Dec 2018
दिवसाच्या खेळाला सुरुवात; भारताला विजयासाठी २ बळींची गरज

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर झाला. पण अखेर वरूणराजाने भारतावर कृपा केली आणि खेळाला सुरुवात झाली. आता भारताला विजयासाठी २ बळींची गरज आहे.

07:00 (IST)30 Dec 2018
पावसाची संततधार सुरूच; उपहाराची विश्रांती लवकर

पावसाची संततधार सुरूच असल्याने उपहाराची विश्रांती लवकर घेण्यात आली आहे. उपहाराच्या विश्रांतीनंतर मैदानाची पाहणी केली जाणार आहे 

05:37 (IST)30 Dec 2018
पुन्हा पावसाला सुूरूवात; भारताची प्रतिक्षा संपेना

पाऊस थांबत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा पावसाला सुूरूवात झाली आहे.  त्यामुळे विजयासाठी भारताची प्रतिक्षा संपेना...

--

05:26 (IST)30 Dec 2018
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर

चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी तब्बल १४१ धावांची आवश्यकता आहे, तर भारताला मात्र सामन्याच्या अंतिम दिवशी केवळ दोन बळींची आवश्यकता आहे. पण असे असले तरी पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही.  त्यामुळे भारताचा विजय लांबणीवर पडला आहे.

--

--

Story img Loader