AUS vs NED, Word Cup 2023: विश्वचषक २०२३च्या २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गडी बाद ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २१ षटकांत ९० धावांत गारद झाला. कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला. या विजयाने त्यांचा नेट रनरेट खूप मजबूत झाला आहे.
नेदरलँडने ऑस्ट्रेलियापुढे गुडघे टेकले
ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सचा वाईट पराभव केला. त्यांनी ३०९ धावांनी मोठा विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच विक्रम मोडला. २०१५ मध्ये पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध २७५ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. २०२३ मध्ये तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध ३१७ धावांनी विजय मिळवला होता.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गडी बाद ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २१ षटकांत ९० धावांत गारद झाला. कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला.
झाम्पाने चार विकेट्स घेतल्या
ऑस्ट्रेलियन संघाने अप्रतिम गोलंदाजी करत नेदरलँडचा २१ षटकांत पराभव केला. त्यासाठी फिरकीपटू अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शला दोन यश मिळाले. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नेदरलँडचे केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. विक्रमजीत सिंगने सर्वाधिक २५ धावा केल्या. तेजा नदामानुरूने १४, स्कॉट एडवर्ड्सने नाबाद १२, सायब्रँडने ११ आणि कॉलिन अकरमनने १० धावा केल्या. मॅक्स ओड्डाड सहा धावा करून बाद झाला, बास डी लीडेने चार आणि आर्यन दत्तने एक धाव केली. लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही.
वॉर्नर आणि मॅक्सवेल यांनी शतके झळकावली
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या होत्या. कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी खेळली आणि अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने ९३ चेंडूत १०४ तर मॅक्सवेलने ४४ चेंडूत १०६ धावा केल्या.
वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने ७१ आणि मार्नस लाबुशेनने ६२ धावा केल्या. जोश इंग्लिशने १४ आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद १२ धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव घेतली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. बास डी लीडेला दोन यश मिळाले. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.