Glenn Maxwell scored the fastest century in an ICC ODI World Cup:आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संघाचा हा निर्णय योग्य ठरवताना ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावले. त्याने ४० चेंडूत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम नोदंवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला ५० षटकांत ८ गडी गमावून ३९९ धावांचा डोंगर उभारता आला. तत्पूर्वी डेव्हिड वार्नरने या स्पर्धेतील आपले सलग दुसरे शतक झळकावले.
कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी खेळली आणि अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने ९३ चेंडूत ११ चौकार ३ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेलने ४४ चेंडूत ९चौकार आणि ८ षटकारांचा पाऊस पाडत १०६ धावा केल्या.
वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने ७१ आणि मार्नस लॅबुशेनने ६२ धावा केल्या. जोश इंग्लिशने १४ आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद १२ धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. अॅडम झाम्पाने एक धाव काढली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. बास डी लीडेला दोन विकेट्स मिळाल्या. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.
हेही वाचा – World Cup 2023: राहुल द्रविडसह भारतीय कोचिंग स्टाफने धरमशालामध्ये ट्रायंड ट्रेकचा घेतला आनंद, पाहा VIDEO
मॅक्सवेलने १८ दिवसांतच मोडला मार्करामचा विक्रम –
या कालावधीत ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले. अवघ्या १८ दिवसांत मॅक्सवेलने एडन मार्करामचा विक्रम उद्ध्वस्त केला. ७ ऑक्टोबर रोजी, मार्करामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले. मार्करामने ४९ चेंडूत शतक झळकावले होते, मात्र मॅक्सवेलने ९ चेंडूंच्या फरकाने ४० चेंडूत शतक झळकावले. मॅक्सवेलने याआधी २०१५ च्या विश्वचषकात ५१ चेंडूत शतक झळकावले होते.
विक्रमी मॅक्सवेल! वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान शतक –
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) ४० चेंडूत विरुद्ध नेदरलँड्स २०२३- दिल्ली
एडन मारक्रम (दक्षिण आफ्रिका) ४९ चेंडूत विरुद्ध श्रीलंका २०२३- दिल्ली
केव्हिन ओब्रायन (आयर्लंड) ५० चेंडूत विरुद्ध इंग्लंड २०११- बंगळुरू
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) ५१ चेंडूत विरुद्ध श्रीलंका २०१५- सिडनी
एबी डीव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ५२ चेंडूत विरुद्ध वेस्ट इंडिज २०१५- सिडनी
मॅक्सवेलने कमिन्ससोबत केली शतकी भागीदारी –
ग्लेन मॅक्सवेलनेही नेदरलँडविरुद्ध शतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली. या सामन्यात अशा दोन खेळाडूंनी ऑस्ट्रेलियासाठी चांगली खेळी खेळली, जे अद्याप विश्वचषकात फॉर्ममध्ये दिसले नव्हते. स्टीव्ह स्मिथनेही आज ७१ धावांची खेळी केली. मॅक्सवेलने ४० चेंडूत ९ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. त्याने पॅट कमिन्ससोबत सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.