Australia vs New Zealand 2nd T20I Updates : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना ७२ धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने आता मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनेही एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे, ज्यामध्ये तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे. मात्र, या सामन्यात मॅक्सवेलला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही आणि चार चेंडूत एका षटकारासह केवळ ६ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
मॅक्सवेलने मोडला ॲरॉन फिंचचा विक्रम –
ग्लेन मॅक्सवेलच्या आधी ऑस्ट्रेलियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी कर्णधार ॲरॉन फिंचच्या नावावर होता, ज्यांनी १०३ सामने खेळताना १२५ षटकार ठोकले होते. आता मॅक्सवेलने त्याला मागे टाकले असून त्याने १०५ सामन्यांमध्ये १२६ षटकार ठोकले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने आतापर्यंत ११३ षटकार ठोकले आहेत. याशिवाय टी-२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये तो आता या यादीत फक्त मार्टिन गुप्टिल आणि रोहित शर्माच्या मागे आहे.
कमिन्सच्या अष्टपैलू खेळामुळे ऑस्ट्रेलिया जिंकला –
ऑकलंडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या टी-२० सामन्याबद्दल सांगायचे तर, ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना ११५ धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. यामध्ये सलामीवीर हेडने २२ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर पॅट कमिन्सच्या २८ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाला १७४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. यानंतर ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडचा न्यूझीलंडचा डाव १७ षटकांत १०२ धावांवर रोखला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत ॲडम झाम्पाने ४ तर नॅथन एलिसने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनीही १-१ विकेट घेतली.