अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावरील दुसऱ्या कसोटीत सामन्यात वॉर्नरने त्रिशतक झळकावलं आहे. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना वॉर्नरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभा करुन दिला.

कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. याचसोबत वॉर्नरने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे. डेव्हिड वॉर्नरने ४१८ चेंडूचा सामना करताना नाबाद ३३५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. वॉर्नरने लॅबुसचेंजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६१, स्टिव्ह स्मिथसोबत १२१ तर मॅथ्यू वेडसोबत ९९ धावांची भागीदारी केली.

अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. पाकिस्तानचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर अपयशी ठरले. शाहीन आफ्रिदीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं, त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. अखेरीस ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९/३ वर घोषित केला. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – स्टिव्ह स्मिथ चमकला, ७३ वर्ष जुना विक्रमही मोडला

Story img Loader